मीठ नव्हे; मेफेड्रॉन! तब्बल साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त | पुढारी

मीठ नव्हे; मेफेड्रॉन! तब्बल साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त

पुणेः पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल साडेतीन कोटीचे मेफेड्रॉन(एम.डी.) ड्रग्ज हस्तगत केले आहे. त्यांच्या परदेशी साथीदारांच्या मागावर गुन्हे शाखेची दहा पथके रवाना झाली आहेत. मिठ विक्रीच्या आडून हे रॅकेट सुरू होते. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली. अमंली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यानंतर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

वैभव उर्फ पिंट्या भारत माने(रा.पुणे), अजय अमरनाथ करोसिया(35, रा.पुणे) आणि हैदर शेख (रा.विश्रांतवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तिघांच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव आणि हैदर हे दोघे डिलेव्हरी देण्याचे काम करत होते. पत्रकार परिषेदेत माहिती देताना या अंमली पदार्थांच्या रॅकेटची पाळेमुळे खोदुन काढणार असल्याचा इशारात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. यावेळी सह पोलीस आयुक्त प्रविण पवार , अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त(गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त(गुन्हे) सुनिल तांबे आणि सतिश गोवेकर उपस्थित होते.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे यांना सोमवार पेठेत एका इर्टिगा गाडीमध्ये सराईत गुन्हेगार वैभव हा गाडीचालकासह मेफेड्रॉन ड्रगची डिलिव्हरी देण्यासाठी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक कोटीचे मेफेड्रोन(500 ग्रॅम) सापडले. वैभव आणि गाडीचा चालक अजय या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलीस खाक्या दाखल्यावर त्यांनी मेफेड्रोन देणार्‍या हैदर शेखची माहिती दिली. त्याच्या मागावर पाच पथके रवाना करण्यात आली. हैदर शेखच्या ताब्यात एक कोटीचे(500 ग्रॅम) मेफेड्रोन आढळून आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याच्या मिठाच्या गोडाऊनमध्ये आणखी दिड कोटीचे (750 ग्रॅम) मेफेड्रोन सापडले. हे गोडावून मिठाचे असून, त्यातील पोत्यांमध्ये मेफेड्रोन आहे का? याची खात्री केली जात आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे यातील एकाही आरोपीवर यापुर्वी अंमली पदार्थ विक्रीचा कोणताही गुन्हा दाखल नाही. तर वैभववर तब्बल 36 गुन्हे दाखल आहेत. तो 2016 मध्ये शेवटचा समर्थ पोलीस ठाण्याच्या गुन्हयात अटक होता. त्याची हैदर शेख बरोबर येरवडा कारागृहात ओळख झाली होती. हैदर हा खूनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता. त्याचवेळी त्यांचा काही नायजेरियन अमली पदार्थ तस्कारांसोबत देखील संपर्क आला. दोघेही 2023 मध्ये कारागृहातून बाहेर आहे. तेव्हा पासून ते अंमली पदार्थाच्या व्यवसायात सक्रीय असल्याची माहिती आहे. दरम्यान दोघांनी हे अमंली पदार्थ सॅम आणि ब्राऊन नावाच्या परदेशी नागरिकांना मुंबईला डिलिव्हरी देणार असल्याचे सांगितले आहे. त्यानूसार परदेशी नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक बाबर, गायकवाड, उपनिरीक्षक रमेश तापकिर, शेळके, गोरे, कोळेकर, मगदुम, देव , नाईक, जाधव, शिंदे, मोकाशी , पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, अभिनव लडकत, दत्ता सोनवणे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशीकांत दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, अय्यज दड्डीकर, सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखील जाधव यांच्या पथकाने केली.

युनिट एकला लाखाचे रिवॉर्ड

अंमली पदार्थ प्रकरणात चांगली कारवाई केल्याने पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांनी गुन्हे शाखा युनिट एकला एक लाखाचे रिवॉर्ड जाहीर केले. तसेच सर्व पथकाचा पोलीस आयुक्तालयात सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांनी ज्या पोलिस अंमलदाराची बातमी होती त्यांचा विशेष उल्लेख करून त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली. आत्तापर्यंत एखाद्या पथकाला एवढ्या मोठ्याप्रमाणात रोख रकमेचा रिवार्ड पोलिस आयुक्तांकडून मिळणे हा पहिलाच प्रसंग असावा.

पोलिसांनी ड्रग फ्री पुणे या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी दहा पथके तैनात केली आहे. या कामात आम्हाला पुणेकरांचे सहकार्य अपेक्षित आहे. जर कोणाला ड्रगच्या संदर्भात माहिती असेल, तर त्यांनी पोलिसांना द्यावी. त्यांचे नाव गोपनिय ठेवले जाईल. यासाठी आम्ही 8975953100 हा मोबाईल क्रमांकदेखील देत आहोत.

– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

 

हेही वाचा

Back to top button