सात मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात : रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार | पुढारी

सात मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात : रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार

हिरा सरवदे

पुणे : भूसंपादनाअभावी अपूर्ण राहिलेले रस्ते पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून सध्या सात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे काम हाती घेतले आहे. ही कामे फेब्रुवारीअखेर रस्ते वाहतुकीसाठी खुली करण्यात येतील. त्यानंतर आणखी सहा मिसिंग लिंकचे काम हाती घेऊन ते रस्ते एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

शहराचा आकार, लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना व सेवासुविधा पुरविल्या जातात. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य शहरासह उपनगरांमध्ये उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि लहान, मोठ्या लांबीचे आणि रुंदीचे रस्ते विकसित केले जातात. मात्र, दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. विकास आराखड्यात (डीपी) दाखवलेल्या रस्त्याची संपूर्ण जागा ताब्यात आली तरच त्या रस्त्याचा पूर्ण वापर करता येतो. अन्यथा लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्ता वापराविना पडून राहतो.

पुण्यातही डीपीमध्ये समावेश असलेले अनेक रस्ते भूसंपादन आणि इतर कारणांमुळे रखडलेले आहेत. महापालिका हद्दीत 520 कि. मी. लांबीचे रस्ते तुकड्या- तुकड्यामध्ये 700 ठिकाणी रखडले आहेत. यामध्ये 0 ते 100 मी., 100 ते 500 मी., 500 ते 1000 मी. आणि त्या पुढे अशा रस्त्यांचा समावेश आहे. याबाबत दैनिक पुढारीने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने या मिसिंग लिंक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 0 ते 100 मीटर अंतरामुळे रखडलेले रस्ते जोडण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यात 33 मिसिंग लिंक जोडण्यात येणार आहेत. यांपैकी 13 मिसिंग लिंकची जागा महापालिकेच्या ताब्यात आली असून सात मिसिंग लिंक जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण करून फेब्रुवारीअखेर हे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

काम अंतिम टप्प्यात असलेल्या मिसिंग लिंक

  • नोबल ते मगरपट्टा
  • नवले ब्रिज ते भूमकर चौक (सेवा रस्ता)
  • विमाननगर ते विमानतळ (एअरपोर्ट)
  • काळेपडळ ते रवी पार्क (हांडेवाडी)
  • गुंजन चौक (येरवडा) ते नदी पात्र रस्ता
  • इंडियन ह्युम पाईप ते गंगा चौक – सिंहगड रस्ता
  • विमानतळ रस्ता ते विमाननगर (सिम्बायोसिस महाविद्यालयाजवळील)

या मिसिंग लिंकचे काम लवकरच सुरू होणार

  • मगरपट्टा ते हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट
  • सूस ते सुतारवाडी बसस्टॉप
  • हांडेवाडी ते मंहमदवाडी- काळेपडळ लिंक
  • शिलाविहार सोसायटी ते मयूर कॉलनी डीपी रस्ता
  • मारुती चौक (बाणेर) ते पॅन कार्ड क्लब रस्ता
  • मुंढवा चौक ते हडपसर रेल्वे

मिसिंग लिंकसंदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी मिसिंग लिंकची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. येथील भूसंपादनासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

वाहतूक व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा घटक असलेले रस्ते महापालिकेकडून केले जातात. मात्र, अनेक लहान अंतराचे रस्ते भूसंपादनाच्या अडचणीमुळे रखडलेले आहेत. हे रस्ते जोडल्यानंतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न बर्‍यापैकी मार्गी लागणार आहे. याच अनुषंगाने महापालिकेने सात मिसिंग लिंक जोडण्याचे काम हाती घेतले असून ते अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय इतर सहा मिसिंग लिंकची जागा ताब्यात आली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

– निखिल मिजार, वाहतूक व्यवस्थापक, पथ विभाग, महापालिका

हेही वाचा

Back to top button