बारामती शहर पोलिसांकडून वेश्या व्यवसायाचा बिमोड; दलाल महिलेवर कारवाई | पुढारी

बारामती शहर पोलिसांकडून वेश्या व्यवसायाचा बिमोड; दलाल महिलेवर कारवाई

बारामती; पुढारी वृत्तसेवा

शहरातील चिमनशहामळा परिसरातील एका लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी शहरातील रुई परिसरातील बयाजीनगर येथे राहणाऱ्या दलाल महिलेवर गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली. तिच्या ताब्यातून एका (२२ वर्षीय) महिलेची सुटका करण्यात आली.

पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी शहर पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्यापासून शहरातील वेश्या व्यवसायावर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. गत आठवड्यात शहरातील गणेश मार्केट भाजी मंडई परिसरात रात्रीच्या वेळी कारवाई करण्यात आली होती. त्यात शहरातील लेंडीपट्टा भागातील एका दलाल महिलेवर गुन्हा दाखल करत तिच्या ताब्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर लागलीच शहरातील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयासमोरील चिमनशहामळा परिसरातील एका लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचाही पर्दाफाश करण्यात आला.

पोलिस हवालदार अमृता भोईटे यांनी याबाबत फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांच्यासह पोलिस कर्मचारी पवार, राऊत, हिंगणे, लाळगे आदींनी या कारवाईत भाग घेतला. गुरुवारी (दि.२५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. चिमनशहा मळा परिसरात दोन महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली होती. त्यानुसार बोगस ग्राहक पाठवून शहानिशा करण्याचे आदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले.

दोन पंचांना सोबत घेत व एक बोगस ग्राहक तयार करत त्याच्याकडे पैसे देण्यात आले. त्याने दलाल महिलेला भेटल्यानंतर तिने एक महिला दाखवली. दीड हजार रुपये स्विकारत त्या महिलेसोबत बोगस ग्राहक गेल्यानंतर त्याने पोलिस निरीक्षक महाडीक यांना मोबाईलवर मिस्ड कॉल देत इशारा केला. बाजूला साध्या वेषात थांबलेल्या पोलिस पथकाने लागलीच तेथील एका लॉजवर छापा टाकत दोघा महिलांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी एका (२२ वर्षीय) महिलेची सुटका केली. ती माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील रहिवाशी असून, सध्या शहरातील रुई परिसरात राहते.

दलाल महिला बारामतीतील बयाजीवस्ती परिसरात राहते. ती या महिलेकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेत होती. निम्मी रक्कम महिलेला देत निम्मी रक्कम स्वतःकडे ठेवत होती. गेल्या दोन महिन्यांपासून ही महिला तिच्याकडे होती. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल जप्त केला. दलाल महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तिला अटक केली.

Back to top button