प्रौढांसाठी बीसीजी लसीकरण लवकरच : डॉ. नितीन अंबाडेकर | पुढारी

प्रौढांसाठी बीसीजी लसीकरण लवकरच : डॉ. नितीन अंबाडेकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बीसीजी लस लहान मुलांप्रमाणेच प्रौढांसाठीही उपयुक्त आहे. लस इतर आजारांविरोधातही परिणामकारक ठरल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळेच 18 वर्षांवरील नागरिकांसाठी मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व खासगी आणि शासकीय यंत्रणेने एकत्र यावे, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले.

लसीकरणाची मोहीम अभियानाचे उद्घाटन डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या हस्ते यशदामध्ये झाले, त्या वेळी ते बोलत होते. 2025 पर्यंत टीबी निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबवला जात आहे. या पार्श्वभूमीवर सेंट्रल टीबी डिव्हिजनचे नवी
दिल्लीतील डॉ. संजय मत्तू यांनी जनजागृतीचे महत्त्व समजावून सांगितले. सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांनी 18 वर्षांवरील बीसीजी लसीकरण पूर्ण राज्यात राबविण्याची घोषणा केली. त्यामध्ये जिल्ह्यासहित, महानगरपलिका, मुंबई यांचा समावेश आहे. त्यांनी या लसीकरणाचा उद्देश टीबी आजार 2025 पर्यंत नियंत्रित करण्याच्या दृष्टीने राज्याची वाटचाल असल्याचे सांगितले.

उपसंचालक डॉ. संदीप सांगळे यांनी टीबीची जगाच्या तुलनेत भारताची सद्य:स्थिती आणि महाराष्ट्राची टीबीच्या आजाराची स्थिती मांडली. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. अनिरुद्ध कडू यांनी पूर्वीच्या क्षयरोगाचा इतिहास असलेल्या व्यक्ती, क्षयरोगाच्या रुग्णांचा संपर्क असलेल्या व्यक्ती, बीएमआय कमी असलेल्या व्यक्ती, 60 वर्षे वय असलेल्या व्यक्ती, तंबाखू आणि मधुमेहाचा इतिहास असलेल्या व्यक्ती यांना लस देणार असल्याचे नमूद केले. डॉ. गोविंद चौधरी, डॉ. अमित लोखंडे, डॉ. कैलास बाविस्कर, डॉ. चारुता गोखले, डॉ. शिंपी, डॉ. राजीव कुमार आणि डॉ. चेतन खाडे, सर्व जिल्ह्यांतून टीबी अधिकारी व लसीकरण अधिकारी या प्रशिक्षणाकरिता उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button