सिंहगड भागात छत्तीसगडचा भात : बियाण्यांच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी | पुढारी

सिंहगड भागात छत्तीसगडचा भात : बियाण्यांच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड भागात छत्तीसगड राज्यातील पारंपरिक भात पिकांची लागवड यशस्वी झाली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात छत्तीसगडचे भात बियाणे, तसेच पानशेतच्या तव, घोल भागातील ‘तांबसाळ’ या पारंपरिक भात पिकांच्या बियाण्यांचे सिंहगड, पानशेत परिसरातील शेतकर्‍यांना प्रायोगिक तत्त्वावर मोफत वाटप करण्यात येणार आहे. सिंहगड, पानशेत मावळ खोर्‍यातील पारंपरिक भाताची गुणवत्ता चांगली आहे. तसेच हा तांदूळ चवदार व दर्जेदार आहे.

कृषी विभागाचे पानशेत विभागाचे कृषी पर्यवेक्षक नितीन ढमाळ यांनी गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात छत्तीसगडमधील आदिवासी भागात लागवड करण्यात येणार्‍या दुबराज, समुंदचीनी लोहंदी व विष्णूभोग या चार जातीच्या भाताचे बियाणे खानापूर येथील कृषी मित्र हनुमंत मारुती वाघ यांना दिले होते. वाघ यांनी या चार वाणांची प्रत्येकी तीन गुंठ्याप्रमाणे 12 गुंठे क्षेत्रात लागवड केली. वाघ यांना दुबराज व समुंदची वाणांचे प्रत्येकी प्रतिगुंठा 25 किलो, तसेच लोहंदी वाणाचे प्रतिगुंठा 35 व विष्णूभोग वाणाचे प्रतिगुंठा 40 किलो उत्पन्न मिळाले.
छत्तीसगडच्या भाताच्या उत्पादनांची पाहणी हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे व राहुरी कृषी विद्यापीठाचे कृषी शास्त्रज्ञ डॉ.उल्हास सुर्वे शास्त्रज्ञ यांनी केली. त्यांना सिंहगड विभागाचे मंडल कृषी अधिकारी शिवाजी खटके, कृषी पर्यवेक्षक वैभवराज पवार, गुलाब कडलग यांनी माहिती दिली.

शेतकरी हनुमंत वाघ म्हणाले, ‘छत्तीसगडच्या पारंपरिक व दर्जेदार भात बियाणांचे शेतकर्‍यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.’ मावळा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक रोहित नलावडे म्हणाले, ‘पारंपरिक भात तसेच इतर पिकांचे जतन व संवर्धन करण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना मोसे खोरे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष लालासाहेब पासलकर यांनी तांबसाळ हे पारंपरिक भाताचे बियाणे उपलब्ध केले आहे.’

पारंपरिक वाण लुप्त होण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यात भात पिकांचे आगार असलेल्या वेल्हे तसेच पश्चिम हवेली तालुक्यात संकरित इंद्रायणी व इतर जातीच्या भाताची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. त्यामुळे पारंपरिक प्रजातीच्या तांबसाळ, दोडकी आदी भातांची लागवड कमी होऊन हे वाण लुप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पारंपरिक जातीच्या भाताचे जतन होण्यासाठी कृषी विभाग व सव मावळा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

छत्तीसगडच्या आदिवासी भागासारखे हवामान, जमीन व पाऊस सिंहगड पानशेतच्या डोंगरीपट्ट्यात आहे. त्यामुळे समुंदचीनी लोहंदी, दुबराज आणि विष्णूभोग या वाणांची सिंहगड भागात यशस्वी लागवड झाली. त्यांचे उत्पन्नही चांगले मिळाले आहे.

– नितीन ढमाळ, कृषी पर्यवेक्षक, हवेली तालुका

हेही वाचा

Back to top button