भावनिक राजकारण ‘तेच’ करतात : शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार

भावनिक राजकारण ‘तेच’ करतात : शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण, संपूर्ण कुटुंबातील लोक एका बाजूला आहेत आणि मी फक्त एकटा बाजूला आहे, असे सांगणे याचा अर्थ लोकांना स्वतःच भावनात्मक करण्याचा व भावनिक राजकारण मांडून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असा पलटवार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला. पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी माढा मतदारसंघातील अकलूज, माळशिरस, वेळापूर, निमगाव, मळवली आदी भागातील 70 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते. येत्या काही दिवसांमध्ये माढा मतदारसंघातील उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

कुटुंबात एकटे पाडले जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. कुटुंबाने एकटे पाडले तरी जनता माझ्यासोबत आहे, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर बारामतीत पत्रकारांशी बोलताना खा. शरद पवार म्हणाले, की भावनात्मक आवाहन आणि भावनिक राजकारण आमच्याकडून करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही ते करतच नाही. बारामतीकर आम्हाला वर्षानुवर्षे ओळखतात. त्यामुळे आम्हाला भावनात्मक आवाहनाची आवश्यकता नाही. ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे, ती पद्धत, त्यांची भाषणे ही काहीतरी वेगळे सुचवत आहेत. त्याची नोंद बारामतीचे मतदार निश्चितपणे घेतील आणि योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे.

ज्याने पक्ष स्थापन केला, त्या संस्थापकाचा पक्ष आणि चिन्ह काढून घेऊन ते दुसर्‍याला देण्याची घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतच्या निकालावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले. या निकालाविरोधात न्यायालयात गेलो आहोत. त्याचा निकाल लवकरच लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चिन्ह काढून घेतले म्हणजे त्याचे अस्तित्व संपवू, असे एखाद्याला वाटत असेल; पण तसे होत नाही. मी स्वतः पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली आहेे. त्यामुळे चिन्ह गेल्याने फरक पडत नाही. तुम्ही लोकांमध्ये जा, आपले चिन्ह पोहोचवा, यश निश्चित मिळेल, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

मुंडेंपेक्षा आव्हाडांचे राष्ट्रवादीसाठी मोठे काम

राज्यात दोन पवारांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे अंतर पडले. आव्हाड हे जयंत पाटील व सुप्रिया सुळे यांना बाजूला सारत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यावर मुंडेंपेक्षा आव्हाड यांचे राष्ट्रवादीसाठी मोठे काम असल्याचे सांगत शरद पवार यांनी मुंडे यांच्यावर शरसंधान केले. आव्हाड यांनी काय बोलावे याचे मार्गदर्शन इतरांनी करण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी मुंडे यांना लगावला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news