अजित पवार काँग्रेसच्या नाराज आमदारांच्या संपर्कात | पुढारी

अजित पवार काँग्रेसच्या नाराज आमदारांच्या संपर्कात

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमधील अनेकजण पक्ष सोडण्यास तयार आहेत. मात्र, भाजपमध्ये थेट प्रवेश करणे काँग्रेसच्या काही आमदारांसाठी अडचणीचे आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदारांच्या संपर्कात आहेत.

अजित पवार गटात हिरामण खोसकर (इगतपुरी), अस्लम शेख (मालाड), झिशान सिद्दीकी (वांद्रे पूर्व), अमीन पटेल (मुंबादेवी), सुलभा खोडके (अमरावती) संजय जगताप, सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार जाण्याची शक्यता आहे. अजित पवार त्यांच्या संपर्कात आहेत. मात्र हे आमदार नेमके केव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

काँग्रेसच्या आमदारांत कमालीची अस्वस्थता आहे, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केले आहे. तसेच आपण कोणत्याही काँग्रेस आमदारांशी संपर्क साधलेला नाही, असे ते म्हणाले आहेत. मात्र, काँग्रेसच्या काही आमदार नाराज असले तरी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करणे त्यांच्या मतदारांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार आहे. यात मुंबईतील झिशान सिद्दीकी, अमीन पटेल, अस्लम शेख या अल्पसंख्याक आमदारांचा समावेश आहे. हे आमदार मुस्लिम मतांवर निवडून येतात. त्यामुळे ते भाजपमध्ये गेले तर त्यांना पुन्हा निवडून येणे अवघड आहे.

Back to top button