बारामतीत कोणीही उभे राहू शकते, लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार : शरद पवार | पुढारी

बारामतीत कोणीही उभे राहू शकते, लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार : शरद पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणीही उभे राहू शकते. लोकशाहीमध्ये निवडणूकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्यासंबंधी तक्रार करण्याचे काहीच कारण नाही, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले. आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी. गेली 55 ते 60 वर्ष आम्ही काय केलं हे लोकांना माहित आहे. बारामतीत उभा राहिलेल्या ज्या संस्था आहेत, त्या कधीपासून आहेत. उदाहरणार्थ विद्या प्रतिष्ठान संस्था स्थापन होऊन सुमारे ५४ वर्ष झाली. कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था १९७१ साली स्थापन झाली. त्यावेळी आज आरोप करणारांचे वय काय होते, याचे कॅल्क्युलेशन त्यांनी केले तर त्यांच्या आणि लोकांच्याही लक्षात येईल. या प्रकारची भूमिका मांडणे कितपत योग्य आहे असे पवार म्हणाले.

तो त्यांचा व्यक्तिगत विचार

माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला मी वेगळा विचार करेन असे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत व्यापारी मेळाव्यात बोलले होते. यासंबंधी शरद पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार असू शकतो. भावनात्मक अपील आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. बारामती मतदारसंघाचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत. त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही. मात्र ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे, त्यांची भाषणे ही काहीतरी वेगळं सुचवत आहेत. त्याची नोंद समंजस मतदार घेतील व योग्य निकाल देतील.

मुंडेंपेक्षा आव्हाडांचे राष्ट्रवादीसाठी मोठे काम

राज्यात दोन पवारांच्यात जे अंतर पडले ते जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे. आव्हाड हे जयंत पाटील व सुप्रिया सुळे यांना बाजूला सारत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यावर शरद पवार म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं याचं मार्गदर्शन इतरांनी करण्याची गरज नाही. आव्हाड यांच्यासंबंधी केलेल्या आरोपांचेही त्यांनी खंडण केले. मुंडे यांचा राष्ट्रवादीमध्ये जो कालखंड गेला त्यापेक्षा किती तरी अधिक वर्षे आव्हाड हे पक्षासाठी काम करत आहेत. त्यांनी देश-राज्य पातळीवर काम केले. संस्थात्मक काम केले. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही काम केले आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी काम केले आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी कोणतीही वेगळी भूमिका घेतली असे नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं, याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही असा टोला त्यांनी मुंडे यांना लगावला.

हेही वाचा

Back to top button