दुर्दैवी ! विचित्र अपघातात स्विफ्ट गाडीतील तिघांचा आगीमध्ये होरपळून जागीच मृत्यू

दुर्दैवी ! विचित्र अपघातात स्विफ्ट गाडीतील तिघांचा आगीमध्ये होरपळून जागीच मृत्यू

मंचर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात स्विफ्ट गाडीतील तिघेजणाचा आगीमध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला. स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने गाडीही पूर्णपणे जळून खाक झाली, तर स्विफ्ट कारमधील एक जण जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. १७) सकाळी ६ वाजता आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील गोरक्षनाथखिंड, तांबडेमळा हद्दीत झाला आहे.

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्विफ्ट कार (एमएच १४ डीटी ०२९५) वरील चालक हा मंचरकडून पुणेकडे जात होता. यावेळी आयशर टेम्पो (एमएच १२ क्यूजी ३३५१) याची धडक स्विप्ट गाडीला बसली. या अपघातात स्विफ्टमधील अंकुश उर्फ अनिकेत ज्ञानेश्वर भांबुरे (वय ३२), वीरेंद्र विजय कदम (दोघेही रा. खेड, ता. खेड), रोहिदास लक्ष्मण राक्षे (राहणार राक्षेवाडी, ता. खेड) यांचा मृत्यू झाला, तर दत्तात्रय चंद्रकांत गोतारणे (वय ३२ रा. राजगुरूनगर, ता. खेड) हा जखमी झाला आहे. महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर (जीजे ०१ डब्लुबी १७३७) हा बंद अवस्थेत उभा होता.

दरम्यानच्या काळात पुण्याहून नाशिककडे जाणारा आयशर टेम्पो (एमएच १२ क्यूजी ३३५१) डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने आला व प्रथम स्विफ्ट गाडी (एमएच १४ डीटी ०२९५) हिला समोरून धडक दिली व त्यानंतर उभ्या कंटेनरला जाऊन धडकला. या अपघातात स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती कळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस हवालदार राजेंद्र हिले यांनी घटनास्थळी भेट दिली असुन पुढील तपास सुरू आहे. अपघाताला कोणते वाहन कारणीभूत ठरले, याचा शोध मंचर पोलीस घेत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news