तिसरी ते बारावीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार

तिसरी ते बारावीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क – स्कूल एज्युकेशनचा अभ्यास करून स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क- स्कूल एज्युकेशन तयार करण्यात आला असून, त्यात आवश्यक बदल करून त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. यावरील अभिप्राय येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. शिक्षक, पालक, विद्यार्थी, क्षेत्रीय अधिकारी, तज्ज्ञ नागरिकांनी आपल्या सूचना व अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांनी केले आहे.

एनईपी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्य अभ्यासक्रम आराखडा -शालेय शिक्षण तयार करण्यात आला असून त्याबाबतचे अभिप्राय स्वीकारले जात आहे. भाषा, गणित, विज्ञान, कला, शारीरिक शिक्षण, समाजशास्त्र व आंतरविद्या शाखीय शिक्षण, त्याचप्रमाणे व्यावसायिक शिक्षण, शालेय संस्कृती व प्रक्रिया साहाय्यभूती प्रणाली तसेच अंतरसमय क्षेत्र याबाबतचे अभिप्राय 9 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत नोंदवता येणार आहेत.

राज्य अभ्यासक्रम आराखडानिर्मिती प्रक्रियेचा भाग म्हणून क्षेत्रीय स्तरावरील परिस्थिती व त्या अनुषंगाने करता येणारे बदल याबाबत अभ्यास करण्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, क्षेत्रीय अधिकारी, तज्ज्ञ नागरी यांची अभ्यासक्रम आराखडा विषयीची मते अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. तरी संबंधितांनी याबाबतचे अभिप्राय विषयनिहाय दिलेल्या लिंकवर नोंदवावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news