

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सर्जिकल साहित्य खरेदीतील गोलमाल, औषध पुरवठ्याचा परवाना नसतानाही न्यूटन एंटरप्रायजेसकडून औषध खरेदी या प्रकरणात चर्चेत आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांची शुक्रवारी उचलबांगडी करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील शल्य चिकित्साशास्त्र प्राध्यापक येथील मूळ पदावर डॉ. गुरव यांची बदली करण्यात आली असून, सीपीआरच्या अधिष्ठाताची अतिरिक्त जबाबदारी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालाचे बालरोग चिकित्साशास्त्र प्राध्यापक डॉ. एस. एस. मोरे यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आल्याचा शासन निर्णय सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी जारी केला आहे.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयास (सीपीआर) बनावट परवान्याच्या आधारे औषधे पुरवठा केल्याबद्दल कोल्हापुरातील न्यूटन एंटरप्रायजेस या वितरकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे अन्न व औषध प्रशासनाने सीपीआरला दिले होते. तरीदेखील अधिष्ठाता डॉ. गुरव यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, सामाजिक संघटना, पक्षांचे पदाधिकारी यांनी या भष्ट्राचारा विरोधात आंदोलन करून आवाज उठविला होता. बुधवारी शिवसेना ठाकरे गटाने अधिष्ठाता कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
न्यूटन एंटरप्रायजेसचे मालक अजिंक्य पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, तरच कार्यालय सोडू, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने अधिष्ठाता डॉ. गुरव यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना न्यूटन एंटरप्रायजेसच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र दिले. मात्र, त्या पत्रावर अधिष्ठाता यांची सही नसल्याचे उघड झाले. गुरुवारपासून अधिष्ठाता डॉ. गुरव अचानक रजेवर गेले होते. शुक्रवारी डॉ. गुरव यांचा थेट बदलीचा आदेश आला असून, त्यांना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मूळ जागेवर नियुक्त केले आहे. अधिष्ठाता डॉ. गुरव यांच्या बदलीमुळे सीपीआर हादरले आहे.