कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत चितेतून भटक्या कुत्र्याने पळविला हात | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत चितेतून भटक्या कुत्र्याने पळविला हात

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचा भटक्या कुत्र्याने चक्क चितेतून हात पळवून काही अंतरावर नेऊन टाकला. हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई यांनी हा प्रकार उघडकीस आणला. मृतदेहाची विटंबना झाल्याने स्मशानभूमीत आलेल्या नागरिकांतून घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

महापालिकेच्या वतीने चारही स्मशानभूमींत मोफत अंत्यसंस्कार केले जातात. शेणींचा तुटवडा असल्याने अंत्यसंस्कारासाठी लाकडाबरोबर शेणीही कमी वापरण्यात येत आहेत. त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. देसाई यांनी कर्मचार्‍यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी अर्धवट जळालेला तो हात दुसर्‍याच मृतदेहाच्या चितेत टाकला. त्यामुळे देसाई यांनी त्या कर्मचार्‍याला खडेबोल सुनावले. दरम्यान, शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

…अन्यथा तीव्र आंदोलन

ज्या चितेवर प्रेत जळत होते, त्या चितेवर अत्यल्प लाकडे व शेणी होत्या. त्यामुळे प्रेत कोळशासारखे दिसत होते. याबाबतीत कर्मचार्‍यांना विचारले असता, कर्मचारी अपुरे आहेत, असे उत्तर देण्यात आले. महापालिकेने त्वरित यात बदल करावा; अन्यथा तीव— आंदोलन छेडू, असा इशारा हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई यांनी दिला.

Back to top button