भाजपकडून जगदीश मुळीक आघाडीवर; शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा | पुढारी

भाजपकडून जगदीश मुळीक आघाडीवर; शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवार निवडीला आता सुरुवात होत असून, राज्यसभेसाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची निवड झाल्यामुळे भाजपतर्फे पुणे शहर मतदारसंघामध्ये माजी आमदार जगदीश मुळीक यांचे नाव इच्छुकांमध्ये आघाडीवर आल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे. भाजपतर्फे शहरातील बहुतेक महत्त्वाची पदे गेल्या पाच वर्षांत शहराच्या पश्चिम भागात देण्यात आली. आत्तापर्यंत भाजपचे लोकसभा आणि राज्यसभेचे सहाही खासदार या परिसरातील आहेत.

अशा स्थितीत कसबा पेठसारखा पाच दशकांचा बालेकिल्ला काँग्रेसने जिंकल्यामुळे, भाजपचे नेतृत्व सावधपणे पावले उचलत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत काल दिवसभर सुरू होती. पक्षाच्या हक्काच्या मतांसोबतच अन्य मते कोणता उमेदवार अधिक प्रमाणात खेचून आणू शकतो, त्याचा विचार प्राधान्याने होण्याची शक्यता असल्याचा या चर्चेचा सूर होता. त्यामुळे मुळीक यांच्या नावाची चर्चा कालपासून जोर धरू लागली आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघांमध्ये सर्वांधिक मतदारसंख्या वडगावशेरी मतदारसंघात आहे. तेथे पाच लाखांच्या आसपास मतदार असून, लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत जवळपास 25 टक्के मतदार या भागातील आहेत. शहराच्या पूर्व भागात पूर्वीपासूनच काँग्रेसचा जोर आहे. विरोधकांचे वर्चस्व असलेल्या या भागातून 2014 मध्ये मुळीक हे भाजपचे पहिले आमदार ठरले.

मुळीक यांचे समर्थक कार्यकर्ते यासंदर्भात त्यांची बाजू मांडताना म्हणाले, की मुळीक यांची स्वच्छ प्रतिमा ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते ही त्यांची जनमानसातील ओळख आहे. मुळीक यांनी गेली तीन वर्षे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना शहराच्या आठही मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणी केली. बूथरचना सक्षम केली. शहराच्या सर्व भागात त्यांचा संपर्क निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पक्षाची पारंपरिक मते मिळणार असताना विरोधकांच्या बालेकिल्ल्यातील मते ते खेचून आणू शकतात. वडगावशेरी मतदारसंघात ते मोठे मताधिक्य मिळवतील.

लोकसभेसाठी इच्छुक असलेले मुळीक निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. त्या दृष्टीने त्यांनी विविध स्वरूपाचे भव्य कार्यक्रम आयोजित केले. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांशी त्यांचा मोठ्या प्रमाणात संपर्क वाढला. या जमेच्या बाजू असल्याने त्यांचा पक्षश्रेष्ठी निश्चितपणे विचार करतील. दरम्यान, भाजपकडून मुळीक यांच्यासोबत माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे प्रमुख इच्छुक आहेत. त्याचबरोबर पक्षाच्या अन्य काही नेत्यांची नावेही चर्चेत असल्याचे कार्यकर्त्यांत बोलले जाते.

हेही वाचा

Back to top button