एसीपीच्या मुलालाच गंडा : आयकरचा छापा पडणार असल्याची बतावणी

एसीपीच्या मुलालाच गंडा : आयकरचा छापा पडणार असल्याची बतावणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दुकानावर आयकर विभागाचा छापा पडणार असल्याचे सांगून व्यवस्थापकाने एका सहायक पोलिस आयुक्ताच्या (एसीपी) मुलाच्या दुकानातून 5 किलो सोने, 50 किलो चांदी आणि रोकड असा 2 कोटी 27 लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. विनोद रमेश कुलकर्णी (वय 35, रा. लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत ज्योतिरादित्य ऊर्फ यश राजेंद्र मोकाशी (वय 22, रा. नीलगिरी लेन, बाणेर रोड, औंध) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 12 मार्च 2022 ते 8 फेब—ुवारी 2024 दरम्यानच्या काळात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योतिरादित्य मोकाशी यांनी दोन वर्षांपूर्वी हडपसरमधील माळवाडी रस्ता परिसरातील शिवनेरी बिल्डिंगमध्ये वसुंधरा ज्वेलर्स नावाने सोने, चांदी दागिने विक्रीचे दुकान सुरू केले होते. या दुकानाचे व्यवस्थापक म्हणून विनोद कुलकर्णीची नेमणूक केली होती. त्या वेळी वसुंधरा ज्वेलर्समध्ये 5 किलो सोने, 85 किलो चांदी अशी भांडवली गुंतवणूक फिर्यादींनी नातेवाईक आणि मित्रांकडून केली होती. हे सगळे सोने, चांदी व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांना देऊन फिर्यादी ज्योतिरादित्य मोकाशी हे एम.एस.चे शिक्षण घेण्यासाठी लंडनमध्ये निघून गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फिर्यादी डिसेंबर 2023 मध्ये पुण्यात आले. यानंतर फिर्यादी मोकाशी यांनी वसुंधरा ज्वेलर्सचे कामकाज पाहायला सुरुवात केली.

दुकानासंदर्भात व्यवस्थापक विनोद कुलकर्णी व इतर स्टाफकडून माहिती घेत असताना फिर्यादी मोकाशी यांच्या लक्षात आले, दुकान सुरू करताना 5 किलो सोने व 85 किलो चांदी घेतली होती. त्यापैकी पावणेतीन किलो सोने व 50 किलो चांदी कमी आहे. ही कमी असलेले सोने व चांदी दुकानात नव्हती. यानंतर फिर्यादी मोकाशी यांनी ही बाब त्यांच्या वडिलांना सांगितली. फिर्यादी यांच्या वडिलांनी सोने, चांदी कमी असल्याबाबत व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली त्याने 7 फेब—ुवारीला उद्या सर्व सोने परत देतो आणि हिशोब पूर्ण देतो, असे म्हणून निघून गेला.

यानंतर 8 फेब्रुवारी रोजी विनोद कुलकर्णीने याने सकाळी 10 वसुधंरा ज्वेलर्समधील एका कामगाराला फोन करून सांगितले की, दुकानावर इन्कम टॅक्सचा छापा पडणार आहे व मालकाला हिशोब द्यायचा आहे. त्यासाठी सोने, चांदी तयार ठेव. यानंतर साडेदहा वाजता एक गाडी आली. कामगारांनी दुकानातील सोने, चांदी देऊन टाकली आणि विनोद कुलकर्णीने सांगितल्याप्रमाणे दुकान बंद केले. दुकानातील व्यवस्थापक विनोद कुलकर्णी याच्याकडे सोपवण्यात आलेले 5 किलो सोने व 50 किलो चांदी आणि रोख रक्कम अशी 2 कोटी 27 लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news