खरीप पीक विम्याचे 2069 कोटी मंजूर.. | पुढारी

खरीप पीक विम्याचे 2069 कोटी मंजूर..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने खरीप हंगाम 2023 मधील राज्याचा विम्याचा दुसरा हप्ता पीकविमा कंपन्यांना मंजूर केला आहे. ही रक्कम दोन हजार 69 कोटी 34 लाख 69 हजार 958 रुपये आहे. संबंधित नऊ विमा कंपन्यांना ही रक्कम मिळाल्यानंतर लवकरच खरिपात पीक कापणी प्रयोग आधारित काढण्यात आलेली नुकसानभरपाईची आकडेवारीनुसारची रक्कम आणि पिकांच्या काढणीपश्चात झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्‍यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात आले.

खरीप हंगाम 2023 साठी राज्य विमा हप्त्याचा दुसरा हप्ता हा विमा कंपन्यांना मंजूर केला आहे. राज्य शासनाने हा विमा हप्ता दिल्यानंतर केंद्र सरकारदेखील त्यांचा दुसरा विमा हप्ता विमा कंपन्यांना देईल. नियमाप्रमाणे असा संपूर्ण विमा हप्ता विमा कंपन्यांना मिळाल्यानंतर ते पीक कापणी प्रयोग व काढणी पश्चात झालेली शेतमालाची नुकसानभरपाई यात लागू होणारी नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्‍यांना देणे अपेक्षित आहे.

खरिपात प्रामुख्याने उडीद, मूग, बाजरी, ज्वारी, सोयाबीन अशा बहुतांशी प्रमुख खरीप पिकांच्या पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी शासनाने विमा कंपन्यांना विमा नुकसानभरपाई निश्चितीसाठी दिलेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे लवकरच विमा कंपन्यांमार्फत विमा नुकसानभरपाई निश्चित होऊन शेतकर्‍यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू होण्याची अपेक्षा कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

हेही वाचा

Back to top button