Sule vs Pawar : माझी कोणाशी वैयक्तिक लढाई नाही : खासदार सुळे | पुढारी

Sule vs Pawar : माझी कोणाशी वैयक्तिक लढाई नाही : खासदार सुळे

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामतीतून कोणीही उभे राहू द्या. माझी कोणाशी वैयक्तिक लढाई नाही, माझी वैचारिक लढाई आहे. त्यांच्या विचारांचा कोणी तरी लढेलच, त्यात नवीन काय, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. बारामतीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचे ठरत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी लढाई ही वैयक्तिक नसून वैचारिक असल्याचे सांगितले. (Sule vs Pawar)

Sule vs Pawar : तुम्ही वडीलांना घराबाहेर  काढाल का? 

वडीलांच्या नावे घर असेल तर तुम्ही वडीलांना घराबाहेर  काढाल का? असे सांगत त्यांनी पक्षफोडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. त्या म्हणाल्या, आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या विचाराने वागतो. प्रभू श्रीरामाने वडीलांच्या शब्दाखातर १४ वर्षांचा वनवास भोगलो. धाकट्या भावाने मोठ्या भावासोबत त्याग केला, हा आपला इतिहास आहे. त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत.  आम्ही जनसेवेसाठी राजकारणात आलेलो आहे. बारामतीत सुरु केलेले कार्यालये हे प्रत्येकाचे हक्काचे कार्यालय आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रांजळ प्रयत्न आमच्याकडून होईल. पवारसाहेबांचे ६ दशकांचे नाते या कार्यालयात उलगडून दाखवले आहे. बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हक्क दाखवणार का या प्रश्नावर त्या म्हणाल्या, माझा तो स्वभाव नाही. हक्क दाखवण्यात नव्हे तर लोकांच प्रेम मिळविण्यात मजा असते.
जिरायत भागातील पाणी प्रश्नावर त्या म्हणाल्या, मी दर सोमवारी त्याचा रिव्ह्यू अधिकाऱयांकडून घेत आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री अजित पवार, जलसंपदा खात्याचे मंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्याशी मी यासंबंधी बोलले आहे. फडणवीस यांनी मला चांगला प्रतिसाद दिला असल्याने मी त्यांची आभारी आहे. बारामतीत विकासकामांची लवकरच उदघाटने होणार आहेत. यासंबंधी त्या म्हणाल्या, विकासकामांचे पैसे माझ्या खिशातून जात नाहीत. केंद्र किंवा राज्याकडून निधी येतो, त्यातून ती कामे होतात. नागरिकांच्या सोयीसाठी ही कामे झालेली आहेत. जरांगे पाटील यांची तब्येत खालावते आहे, असंवेदनशील ट्रीपल इंजिन खोके सरकारने तातडीने त्यांच्याशी चर्चा करावी. प्रश्न सोडवावा. त्याचबरोबर मुस्लिम, धनगर, लिंगायत आदींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button