Pune : तरुणाईकडून ‘व्हॅलेंटाईन डे’चे सेलिब्रेशन | पुढारी

Pune : तरुणाईकडून 'व्हॅलेंटाईन डे'चे सेलिब्रेशन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रेमाला शोधण्याचा अन् प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे… बुधवारी (दि.14) हाच प्रेमाचा दिवस तरुणाईने जल्लोषात साजरा केला. कोणी कँडल लाइट डिनरला जाण्याचे निमित्त साधले, तर कोणी गुलाबपुष्प अन् चॉकलेट देऊन प्रेयसी-प्रियकराला प्रपोज केले. अनेकांनी या खास दिवशी आपल्या प्रेमभावनेला मोकळी वाट करून दिली अन् प्रेमोत्सवाचा हाच रंग शहरात विविध ठिकाणी पाहायला मिळाला. ठिकठिकाणचे रेस्टॉरंट अन् कॅफेमध्ये व्हॅलेंटाईन डेचे सेलिब्रेशन रंगले होते.
काही ठिकाणी हातात गुलाबी रंगाचे फुगे अन् गुलाबपुष्प हाती घेतलेली तरुणाई प्रेमाचा दिवस साजरा करताना पाहायला मिळाली. ज्येष्ठ जोडप्यांनीही प्रेमाचा हा दिवस खास पद्धतीने सेलिब्रेट केला.

काहींनी शॉपिंग करीत, रेस्टॉरंटमध्ये जेवण करीत प्रेमाचा हा दिवस खास बनविला. या दिवशी अनेकांनी लाँग ड्रॉइव्हला जाण्याचे निमित्त साधले तर काहींनी एकमेकांना गुलाबाची फुले, चॉकलेट आणि भेटवस्तू देत सेलिब्रेशन केले. कोणी एकमेकांना लग्नासाठी विचारणा केली तर काहींनी लोणावळा, मुळशी, पानशेत, पाचगणी, महाबळेश्वर आदी ठिकाणी फिरायला जाण्यास प्राधान्य दिले. महाविद्यालयांचे कट्टेही तरुण जोडप्यांच्या सेलिब्रेशनने बहरले होते. महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या फूल विक्रेत्यांकडून गुलाबपुष्प विकत घेणारी तरुणाईही पाहायला मिळाली.

हृदयातील भावनेला मोकळी वाट देत ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्या जोडीदाराकडे प्रेम व्यक्त केले, तर सायंकाळी ठिकठिकाणी आयोजिलेल्या म्युझिक कॉन्सर्टला तरुणाईने उपस्थिती लावली. सोशल मीडियावरही व्हॅलेंटाईन डे फिव्हर पाहायला मिळाला. आपल्या जोडीदारासोबतची छायाचित्रे, सेल्फी, व्हिडीओ शेअर करीत अनेकांनी त्यांना व्हॅलेटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. आपले प्रेम कसे जुळले, ते कसे व्यक्त झाले आणि प्रेमाचे नाते कसे जोडले गेले, अशा कित्येक आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. फेसबुक, इन्स्टाग्रामवर खास संदेश लिहित अनेकांनी प्रेम व्यक्त केले तर काहींनी खास व्हिडीओ शेअर करीत प्रेमभावना बोलक्या केल्या. सोशल मीडियाद्वारेही अनेकांनी भावनांना मोकळी वाट करून दिली. एकूणच, सगळीकडे व्हॅलेंटाईन डेचे वातावरण बहरले होते.

ठिकठिकाणी प्रेमाचा रंग

यंदाही प्रेमोत्सवाचा रंग शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळाला. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता असो वा कॅम्प येथील महात्मा गांधी रस्ता, अशा विविध ठिकाणी व्हॅलेंटाईन डे फिव्हर रंगला होता. गुलाबपुष्प हाती घेतलेली तरुणाई अन् लाल-गुलाबी रंगाचे कपडे परिधान केलेली तरुणाई ठिकठिकाणी दिसून आली. येथील रेस्टॉरंट, आईस्क्रीम पार्लर आणि कॅफेमध्येही यानिमित्त सेलिब—ेशन करताना तरुणाई दिसून आली.

हेही वाचा

Back to top button