मेधा कुलकर्णींनी बदलली समीकरणे; भाजप उमेदवार निवडीचे निकष बदलणार

मेधा कुलकर्णींनी बदलली समीकरणे; भाजप उमेदवार निवडीचे निकष बदलणार

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील भाजपच्या उमेदवारीबाबत पक्षांतर्गत स्पर्धा तीव— झालेली असतानाच, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार निवडीचे निकष बदलणार आहेत. सर्व्हे आणि निवडून येण्याची क्षमता याआधारे उमेदवार ठरविताना प्रतिस्पर्धी पक्षाच्या संभाव्य उमेदवाराची ताकद असलेला परिसर, भाजपची सहा विधानसभा मतदारसंघातील सध्याची स्थिती हेही विचारात घेतले जाण्याची शक्यता आहे.

पुण्यातून भाजपचे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार वंदना चव्हाण यांचे राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपणार आहे. पुण्यातून दोन खासदार निवृत्त होत असताना, त्यांच्याजागी भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांना भाजपने संधी दिली. जावडेकर आणि कुलकर्णी हे दोघेही कोथरूड परिसरातील रहिवासी आहेत.
भाजप आणि शिवसेना यांची युती 2014 मध्ये तुटल्यानंतर शेवटच्या क्षणी कोथरूड मतदारसंघातील भाजपची उमेदवारी मेधा कुलकर्णी यांना मिळाली होती.

त्या लाखापेक्षा अधिक मताधिक्यांनी निवडून आल्यानंतर, 2019 मध्ये त्यांच्या जागी भाजपने तत्कालिन प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर, कुलकर्णी यांना राष्ट्रीय महिला मोर्चा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी विविध राज्यांत काम केले. पक्षनिष्ठेची पावती त्यांना उमेदवारीच्या रूपाने मिळाली. पुण्यात लोकसभेसाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक आणि माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर भाजपकडून इच्छुक आहेत. इतरही काही नावे चर्चेत आहेत. कुलकर्णी यांच्या निवडीने स्थानिक राजकीय आराखडे बदलण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील, मोहोळ आणि मेधा कुलकर्णी हे तिघेही कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आहेत. जावडेकरही याच भागातील होते. याच भागात पक्षाकडून वारंवार पदे का दिली जात आहेत, या मुद्दा पक्षांतर्गत विरोधी कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जाऊ शकतो.
कोथरूड आणि पर्वती हे मतदारसंघ भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कसबा पेठेत पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने, त्या मतदारसंघाचा कौल येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या बाजूला झुकणार, त्याकडे लक्ष आहे. शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट हे मतदारसंघ लहान असल्याने फारसे मताधिक्य मिळणार नाही. वडगावशेरी मतदारसंघ कोणाच्या बाजूने झुकणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आहेत. या भागातून 2014 मध्ये भाजपचे जगदीश मुळीक निवडून आले होते. तेदेखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत.

पुण्यातून राज्यसभेवर बाराव्या खासदार

राज्यसभेवर खासदार म्हणून पुणे शहरातील अकरा जणांनी आतापर्यंत काम केले असून, मेधा कुलकर्णी या बाराव्या खासदार असतील. यामध्ये तीन महिलांना संधी मिळाली. काही जण एका वेळेपेक्षा अधिक वेळा राज्यसभेवर निवडून गेले. केंद्रीय मंत्रिपद भुषविलेले मोहन धारिया, विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, प्रकाश जावडेकर हे एकावेळेपेक्षा अधिक वेळा राज्यसभेत निवडून गेले होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, ज्येष्ठ विचारवंत नानासाहेब गोरे, विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टिळक, उद्योजिका अनु आगा, माजी मंत्री वसंतराव चव्हाण, उद्योजक संजय काकडे हेही राज्यसभेचे खासदार होते. राज्यसभेतील विद्यमान खासदार वंदना चव्हाण आता निवृत्त होत आहेत. आता राज्यसभेसाठी पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

ब्राह्मणांची नाराजी दूर

कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला उमेदवारी न मिळाल्याने नाराजीचा सूर असल्याची चर्चा तेव्हा झाली होती. पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाची दखल पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांची निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news