शेततळ्यांना 44 कोटींचे अनुदान; पांडुरंग शेळके यांची माहिती | पुढारी

शेततळ्यांना 44 कोटींचे अनुदान; पांडुरंग शेळके यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी स्थिती पार्श्वभूमीवर मागेल त्याला शेततळे योजनेला शेेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्य:स्थितीत प्राप्त अर्ज, छाननी, मंजुरी होऊन तयार झालेल्या 8 हजार 267 शेततळ्यांपैकी 6 हजार 449 शेततळ्यांना 44 कोटी 20 लाख रुपयांइतके अनुदान थेट वितरण केले आहे, अशी माहिती मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनचे सहसंचालक पांडुरंग शेळके यांनी दिली. त्यातून सुमारे 12 हजार 898 हेक्टर क्षेत्र नव्याने संरक्षित सिंचनाखाली येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून (मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना) मागेल त्याला शेततळे योजनेत वैयक्तिक शेततळ्यांची योजना राबविण्यात येत असून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

जिल्हानिहाय शेततळ्यांची संख्या

अहमदनगर 1409, बीड 79, बुलढाणा 67, छत्रपती संभाजीनगर 212, धाराशिव 124, हिंगोली 40, जालना 191, कोल्हापूर 64, लातूर 59, नांदेड 40, नाशिक 919, पालघर 41, परभणी 60, पुणे 655, रायगड 52, रत्नागिरी 18, सांगली 545, सातारा 177, सिंधुदुर्ग 10, सोलापूर 936, ठाणे 38 व अन्य जिल्ह्यांतील शेततळ्यांचा समावेश आहे.

86 कोटी रुपयांचा निधी…

  • वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याकडे नावावर कमीत कमी एक एकर जमीन असावी, तर कोकण विभागासाठी क्षेत्राची अट 20 गुंठे इतकी आहे. मात्र, कमाल क्षेत्र धारणेची मर्यादा नाही.
  • लाभार्थी शेतकर्‍याची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकद़ृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे.
  • योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्याला किमान 14 हजार 433 रुपये व जास्तीत जास्त 75 हजार रुपये इतके अनुदान दिले जाते. योजनेची अंमलबजावणी महा-डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सन 2022-23 व सन 2023-24 मध्ये राज्य सरकारकडून एकूण 86 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

हेही वाचा

Back to top button