वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई न करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन | पुढारी

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई न करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि त्यासंबंधीचे परिपत्रक तातडीने काढले जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाला दिले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई केली जात आहे. स्टॉलमुळे वाहतुकीला कोणताही अडथळा होत नसतानाही पालिकेकडून होणार्‍या कारवाईने विक्रेते हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांची भेट घेतली.

या वेळी वृत्तपत्र विक्रेते हे पहाटेपासून ते दुपारी 12 पर्यंत व्यवसाय करतात. बहुतांश विक्रेत्यांचे काम दुपारी 12 पूर्वी संपते. वृत्तपत्र विक्री व्यवसाय हा अत्यावश्यक सेवेत येतो. त्यांच्या स्टॉलमुळे वाहतुकीस अडथळा होत नाही, तरीही अतिक्रमण विभागातून कारवाई केली जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मुंबई महापालिकेने वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई करू नये, असे परिपत्रक काढले आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेनेही परिपत्रक काढून प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने अति. आयुक्तांना दिले. त्यावर त्यांनी यासंदर्भात लवकरच परिपत्रक काढून कारवाई न करण्याच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिल्या जातील असे आश्वासन दिले.

हेही वाचा

Back to top button