निरा गुदमरली ! पडला जलपर्णीचा विळखा! | पुढारी

निरा गुदमरली ! पडला जलपर्णीचा विळखा!

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा :  परिसरातील शेती आणि जनावरांसाठी महत्त्वपूर्ण असणार्‍या निरा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. जलपर्णीमुळे नदीतील जलप्रदूषणात वाढ झाली असून, शेतीसह ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुक्यातील विविध प्रकल्पांचे पाणी निरा नदीत मिसळत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.

निंबुत, मुरुम, होळ, कोर्‍हाळे येथे निरा नदीत जलपर्णीचा धोका वाढला आहे. नदीला गटाराचे रूप आले असून, पाण्याला प्रचंड दुर्गंधी वाढली आहे. अनेक पर्यावरणप्रेमींनी जलपर्णी हटविण्यासाठी अनेकदा आंदोलने केली. मात्र, याला यश आले नाही. केंद्र व राज्य सरकारने जलप्रदूषण होऊ नये, यासाठी केलेल्या उपायोजना आता थोडक्या पडू लागल्या आहेत. याशिवाय बारामती तालुक्यातून वाहणारे ओढे आणि नाल्यांचीही जलपर्णीमुळे दुरवस्था झाली आहे. नदीप्रमाणेच ओढ्यांना जलपर्णीने वेढा दिल्याने प्रदूषण वाढले आहे. जलसंपदा विभागांतर्गत येणार्‍या काही ओढ्यांची कित्येक दिवसांत साफसफाई आणि स्वच्छता न केल्यामुळे पावसाळ्यात येणारे पाणी अनेकांच्या घरात आणि शेतात जाते.

पावसाळ्यात ओढ्यातून वाहत जाणारे पाणी पुढे निरा नदीला मिळते. यातील राडारोडा, प्लास्टिक कचरा, जलपर्णी, झाडेझुडपे आदी नदीतील पाण्यात मिसळत असल्याने नदीच्या पाण्याचे प्रदूषण होते. विविध प्रकल्पांमधून येणारे दूषित पाणी ओढ्यात मिसळत असल्याने आणि शासनाच्या वतीने ओढे-नाले दुरुस्त होत नसल्याने त्यामध्ये गाळ साठून पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत आहे. दूषित पाणी जनावरांनाही पिण्यास योग्य राहत नाही. शेतीलाही या पाण्याचा फारसा उपयोग होत नसल्याने यातून वाहणारे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नदीची व ओढ्याची दुरुस्ती करून वाहणारे पाणी अडविणे गरजेचे असून, यातून शेतीसह वापराच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

मासेमारी व्यवसायाला फटका
आमच्या समाजाचा मासेमारीवर जवळपास 90 टक्के कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, वाढत्या जलपर्णीमुळे मत्स्य व्यवसायावर परिणाम होत असून, आमच्या व्यवसायाला फटका बसला आहे. यामुळे आर्थिक बाबींचा सामना करावा लागत आहे. तसेच जलपर्णीच्या प्रदूषणामुळे संपूर्ण अंगाला खाज सुटते. तातडीने प्रशासनाने जलपर्णी काढण्याची गरज निंबुतचे मासेमारी व्यावसायिक संतोष शिंदे, राजू जाधव, भाऊ पवार, किरण घाडगे यांनी व्यक्त केली.

Back to top button