कर्नाटकच्या गँगस्टरला पुण्यात बेड्या; तीन पिस्तुले, 25 काडतुसांसह अटक | पुढारी

कर्नाटकच्या गँगस्टरला पुण्यात बेड्या; तीन पिस्तुले, 25 काडतुसांसह अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील कुख्यात गँगस्टर तसेच तेथील धर्मराज चडचण (डीएमसी) टोळीच्या म्होरक्यासह तिघांना पर्वती पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून तीन पिस्तुले आणि 25 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. लक्ष्मीनारायण टॉकीज परिसरातून कारमधून जात असताना त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. मड्डू ऊर्फ माडवालेय्या (वय 35, रा. विजापूर, कर्नाटक), सोमलिंग दर्गा (वय 28) व प्रशांत गोगी (वय 37) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन पिस्तुले आणि 25 जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

गेल्या दोन महिन्यांपासून मड्डू कुटुंबासह कोंढवा पिसोळी येथे राहतो. कर्नाटकातील प्रतिस्पर्धी टोळीच्या भीतीपोटी तो पुण्यात राहतो. पुण्यात तो कोणाच्या संपर्कात होता, याचा तपास पोलिस करीत आहेत. पर्वती पोलिसांचे पथक गस्त घालत असताना वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना समजले की, मड्डू शहरात येणार आहे. तो कारने साथीदारांसोबत येत आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. संशयित कार दिसताच तिघांना ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्यांच्याकडे 3 पिस्तुले आणि 25 जिवंत काडतुसे आढळून आली.

ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यांच्याकडून 5 मोबाईल, कार, 3 पिस्तुले आणि 25 काडतुसे असा एकूण 11 लाख 90 हजारांचा ऐवज जप्त केला. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक सचिन पवार, पोलिस हवालदार कुंदन शिंदे, दयानंद तेलंगे पाटील, सद्दाम शेख, पुरुषोत्तम गुन्ला आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

उत्तर कर्नाटकात मड्डूची दहशत

उत्तर कर्नाटकात डीएमसी आणि महादेव बहिरगोंड (सावकार) या दोन टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्यांचा गुन्हेगारी जगतात दबदबा आहे. पोलिस चकमकीत धर्मराज चडचण याचा मृत्यू झाला आहे. धर्मराजच्या भावाचा खून सावकार टोळीने केल्याच्या संशय आहे. मड्डू डीएमसी टोळी चालवतो. त्याने 40 साथीदारांसोबत 5 पिस्तुलांच्या मदतीने सावकार याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सावकार टोळीचे दोन सदस्य ठार झाले होते. मड्डूची या परिसरात मोठी दहशत असून, त्याच्या नावावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचा

Back to top button