Pune : मोक्कातील फरारींमुळे जामीनदारांची पंचाईत.. | पुढारी

Pune : मोक्कातील फरारींमुळे जामीनदारांची पंचाईत..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आलेल्या आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. आरोपी मिळून येत नसेल तर त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पोलिस करणार आहेत. एवढेच नाही तर जामीनदारांचा शोध घेऊन त्यांना आरोपींबाबत माहिती घेतली जाते. त्यामुळे मोक्कातील फरारींमुळे जामीनदारांची चांगलीच पंचाईत होणार असल्याचे दिसून येते.

मागील तीन वर्षात पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी मोक्का या शस्त्राचा प्रभावी वापर केला आहे. त्याचे सकारात्मक परिमाण देखील आहेत. मात्र मोक्का कारवाईतील तब्बल 191 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्यावर आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिस आता त्यांच्या जामीनदारांचा शोध घेणार घेणार आहेत. जामीनदारांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे जामीनदारांची चांगलीच पंचाईत होऊ शकते. तसेच आरोपींच्या नातेवाईकांचे डोजीअर भरून घेतले जात आहेत. अनेकदा आरोपीने त्याचा पत्ता बदललेला असतो, त्याच बरोबर त्याचा संपर्क क्रमांक नसतो. त्यामुळे पोलिस आरोपींच्या नातेवाईकांचा शोध घेऊन आरोपीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

…तर मालमत्ता होणार जप्त

न्यायालयाच्या मार्फत मोक्कातील फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. फरार 191 आरोपींच्या बाबत ही प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. त्यामुळे फरार आरोपींची मालमत्ता जप्त होऊ शकतो.

स्टॅण्डिंग वॉरंटची अंमलबजावणी

फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिस सुरूवातीला समन्स, त्यानंतर बेलेबल वॉरंट काढतात. त्यानंतर देखील तो हजर झाला नाही तर नॉन बेलेबल वॉरंट काढले जाते. तरी देखील आरोपी मिळून आला नाही तर पोलिस शेवटी स्टॅण्डींग वॉरंट काढतात. या वारंटला मुदत कालावधी नसतो. म्हणजेच जो पर्यंत आरोपी मिळून येत नाही तोपर्यंत त्याची मुदत असते. त्यामुळे पोलिस मोक्कातील फरार आरोपींना शोधण्याठी स्टॅण्डींग वॉरंट काढणार आहेत.

मागील तीन वर्षाच्या कालावधीत मोक्कातील 191 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मालमत्ता जप्ती, जामीनदार, नातेवाईकांची माहिती संकलीत केली जाते आहे. तसेच त्यांच्यासाठी स्टॅण्डींग वॉरंट देखील लवकरच जारी केले जाणार आहे.

– शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे शाखा

हेही वाचा

Back to top button