

लंडन : काच आणि अंडी या गोष्टी अशा आहेत ज्यांना कधी तडा जाईल व त्या फुटतील हे काही सांगता येत नाही. अंडी तर अनेकवेळा बाजारातून घरी आणेपर्यंत फुटलेली असू शकतात! अशा स्थितीत जर एखादे अंडे तब्बल 1700 वर्षे सुरक्षित राहिले म्हटल्यावर आपल्याला निश्चितच आश्चर्य वाटू शकते. इंग्लंडमध्ये असे अंडे सापडले आहे.
इंग्लंडच्या एका प्राचीन वास्तूमध्ये खोदकाम सुरू असताना हे अंडे सापडले. ते स्कॅन केल्यावर समजले की ते पूर्णपणे सुरक्षित आहे. बकिंघमशायरमध्ये एलिसबरीच्या बेरीफील्डमध्ये हे अंडे सापडले. रोमन काळातील या अंड्याचा पिवळा आणि पांढरा भाग अजूनही शाबूत आहे. पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात हे अंडे सापडले व त्यामुळेच ते सुरक्षित राहिले. पुरातत्त्व संशोधक डॅना गुजबर्न यांनी सांगितले की, या अंड्याच्या आत हवेचा एक बुडबुडाही आहे. या बुडबुड्यामुळेच त्यांना समजले की आतील तरल पदार्थही अजून कायम आहे. अंडे हलवले तर त्यामधील हा बुडबुडाही हलतो.