नाशिक : स्टॅम्पपेपर गेले कोठे ? अनेकांची धावपळ अन् चौकशी | पुढारी

नाशिक : स्टॅम्पपेपर गेले कोठे ? अनेकांची धावपळ अन् चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने जिल्ह्यात मुद्रांक (स्टॅम्पपेपर) चा तुटवडा होत आहे. त्यामुळे पक्षकार, वकील, नागरिक यांची स्टॅम्पसाठी धावपळ होताना दिसत आहे. तसेच स्टॅम्पअभावी अनेकांची कामे खोळंबल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी स्टॅम्प मिळत आहे त्या मुद्रांक (Stamp paper) विक्रेत्यांकडे नागरिकांच्या रांगा दिसत आहेत.

निबंधक कार्यालयात मालमत्तेच्या नोंदणीसाठी, महसूल विभागात विविध दाखल्यांसाठी, महापालिकेत दाखले मिळविण्यासाठी प्रतिज्ञापत्र बनविण्यासाठी स्टॅम्पपेपरचा वापर होतो. तसेच सर्वसामान्य नागरिकांना घरखरेदी, भाडेकरार करण्यासाठी स्टॅम्पची आवश्यकता भासते. त्यामुळे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरला सर्वाधिक मागणी असते. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून स्टॅम्पपेपरचा मुबलक पुरवठा हाेत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. मुद्रांक विक्रेत्यांकडे स्टॅम्पपेपरबाबत अनेक जण चौकशी करत आहेत. मात्र, स्टॅम्पपेपरचा पुरवठाच होत नसल्याने विक्रेतेही हतबल होत आहे. जिल्हा न्यायालय, सीबीएस परिसरासह शहरातील बहुतांश मुद्रांक विक्रेत्यांकडे नागरिक, पक्षकार, वकील स्टॅम्पपेपरची (Stamp paper) चौकशी करीत आहेत. मात्र, ते मिळत नसल्याने त्यांची कामे प्रलंबित राहत असून, स्टॅम्पपेपर मिळाल्यानंतरच कामे मार्गी लागणार असल्याने पुरवठा नियमित करण्याची मागणी होत आहे.

आम्ही दर दोन दिवसांनी तीन हजार मुद्रांकांची मागणी करतो. मात्र, प्रत्यक्षात अवघे ५०० मुद्रांक मिळत आहेत. वरिष्ठ पातळीवरूनच तुटवडा असल्याचे सांगण्यात येते. आम्हाला मागणीप्रमाणे पुरवठा द्यावा, शासनानेही याकडे लक्ष घालावे. – ॲड. पांडुरंग तिदमे, संचालक, दि नाशिक डिस्ट्रिक्ट ॲडव्होकेट्स मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. नाशिक.

Back to top button