

धानोरी : पुढारी वृत्तसेवा : 'महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही,' असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सध्या महापालिकेत नगरसेवक, विरोधक, स्थायी समिती अध्यक्ष नाहीत. आयुक्त विक्रम कुमार हे होलसेल आहेत. त्यामुळे विरोधाचे कारण न सांगता वेळेत कामे झाली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. लोहगाव येथील गजानन मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
लोहगाव, वाघोली परिसरातील समान पाणीपुरवठा योजनेसाठी 230 कोटी रुपये, धानोरीतील पाण्याच्या टाकीसाठी चार कोटी व वडगाव शिंदे जलजीवन योजनेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी आमदार सुनील टिंगरे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय व आयटीआयसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोहगावचा विकास आराखडा लवकरात लवकर मंजूर व्हावा. रखडलेले डीपी रस्त्यांचे काम मार्गी लागावे. विमानतळालगतच्या जमिनींची विक्री अथवा विकास करताना येणारे अडथळे दूर करावेत तसेच 11 गुंठे अट रद्द करून एक गुंठा जमिनीचेही खरेदीखत करता यावे, अशा मागण्या आमदार सुनील टिंगरे यांनी या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्या.
आमदार चेतन तुपे, माजी आमदार रामभाऊ मोझे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पांडुरंग खेसे, सतीश म्हस्के, अर्जुन गरुड, सुहास टिंगरे, अशोक खांदवे, सुभाष काळभोर, नीलेश पवार, विनोद पवार, शशिकांत टिंगरे, सुशांत माने, उषा कळमकर, राजेंद्र खांदवे, डॉ. राजेश साठे, नवनाथ मोझे, बंडू खांदवे, बाळासाहेब गलांडे आदी या वेळी उपस्थित होते.
अनेकांना दैवत मानून म्हणून इथपर्यंत पोहचलो आहे. पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालो आहे. आता साठी उलटली, तरी काही लोक आमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत; मग करायचं काय? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली.
समान पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध निधीतून सुमारे 450 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी पुढील तीस महिन्यांचा कालावधी लागेल.
-विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका
हेही वाचा