कुणी मुख्याध्यापक देईल का?; महापालिकेच्या शाळांतील व्यथा | पुढारी

कुणी मुख्याध्यापक देईल का?; महापालिकेच्या शाळांतील व्यथा

संतोष निंबाळकर

विश्रांतवाडी : पुढारी वृत्तसेवा : सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन पदोन्नती देऊन महापालिका शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांची नेमणूक होत असते. मात्र, रिक्त झालेली पदे न भरल्याने गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या अनेक प्राथमिक शाळांना मुख्याध्यापक नाहीत. त्यामुळे त्या शाळांमधील ज्येष्ठ शिक्षकच प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. महापालिकेच्या ज्या शाळांची पटसंख्या दीडशे पेक्षा जास्त आहे, त्या शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापकांची नियुक्ती होत असते. मात्र, येरवडा – विश्रांतवाडी भागातील नऊ प्राथमिक मराठी व पाच उर्दू शाळांना मुख्याध्यापक नाहीत.

या शाळांमध्ये ज्येष्ठ शिक्षक प्रभारी मुख्याध्यापक म्हणून शाळेचा कामकाज पाहत आहेत. या शिक्षकांना आपले वर्ग पाहून मुख्याध्यापक पदाचे कामकाज पाहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती सजग नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे फक्त येरवडा भागात ही अवस्था असेल, तर संपूर्ण पुणे शहरामध्ये काय परिस्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या मध्यवर्ती भागात अतिरिक्त शिक्षिका आहेत. मात्र तोकडे मानधन मिळत असल्याने त्या शिक्षिका लांब अंतरावरील शाळांमध्ये जायला तयार होत नाहीत. या शिक्षिकांना सेवेत कायम करून घेतल्यास हा प्रश्न सुटू शकतो. त्याबाबतचा अभिप्राय शासनाने महापालिका शिक्षण विभागाकडे मागविल्याची माहिती आहे.

अंगणवाड्यांबाबतही अनास्था

विश्रांतवाडीतील 118 बी, विद्यानगर येथील 102 जी, धानोरीतील 164 बी, फुलेनगर येथील 50 बी, उर्दू शाळा 23 जी आदी शाळांमध्ये अंगणवाड्यांसाठी सेविकांची मागणी होत आहे. शिक्षणाचा श्री गणेश ज्या वर्गातून होतो, त्या सुरुवातीच्या वर्गांनाच शिक्षिका उपलब्ध नसल्याने महापालिकेला शाळा चालवायच्या आहेत की नाही, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

सर्व शाळांना पूर्णवेळ मुख्याध्यापक मिळाले पाहिजेत. अंगणवाड्यांसाठीदेखील सेविकांची पूर्तता होणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्याने विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता मिळत नाही. उलट आहे ते शिक्षकच अतिरिक्त ठरतात.

– नितीन वाणी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे शहर

मुख्याध्यापक पदासाठीची पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. निवड समितीची लवकरच बैठक होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष चालू होण्यापूर्वी मुख्याध्यापकांच्या नियुक्त्या होतील.

– राजीव नंदकर, उपायुक्त, महापालिका

हेही वाचा

Back to top button