पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरद मोहोळच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपी आता मोक्का कोठडीत असून, त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात दोन वकिलांसह सात आरोपींना विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयाने 17 फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी सुनावली. तपासादरम्यान या आरोपींचा गुन्ह्याच्या कटातील सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
कुख्यात शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेल्या सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. तत्पूर्वी, या गुन्ह्यात अटक केलेल्या अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान, धनंजय मारुती वटकर, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या आरोपींना सोमवारी मोक्का न्यायालयात प्रथमच हजर करण्यात आले.
तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे आणि विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी सर्व आरोपींची गुन्ह्याच्या कटातील सहभाग निष्पन्न करण्यासाठी समोरासमोर चौकशी करायची आहे, तसेच त्यांच्या मालमत्तेबाबत सखोल तपास करायचा असल्याची माहिती न्यायालयाला दिली.
हेही वाचा