पोलिसांच्या ‘निशाण्या’वर पिस्तूलबाज : अ‍ॅक्शन प्लान तयार | पुढारी

पोलिसांच्या ‘निशाण्या’वर पिस्तूलबाज : अ‍ॅक्शन प्लान तयार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदा पिस्तुलातून झालेल्या गोळीबारांच्या घटनांची गंभीर दखल घेतल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे पोलिसांनी पिस्तूलबाजांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. चार विभागांमध्ये अ‍ॅक्शनप्लॅन तयार करण्यात आला आहे.

शस्त्र बाळगणारे सराईत, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे, कारवाईनंतर दुसर्‍यांदा केलेला गुन्हा, शस्त्रविक्री करणारे तस्कर यांची कुंडली गुन्हे शाखेकडून एकत्र करण्यात येत आहे. मागील पाच वर्षात पुणे पोलिसांनी 461 पिस्तूल, तर 2 हजार 425 काडतुसे जप्त केली आहेत. यामध्ये तब्बल 526 पिस्तूलखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या पंधरवड्यात राज्यभरात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, दोन दिवसांपूर्वी बाणेर येथील एका सराफ व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडून स्वत:ही आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍यांवर गुन्हे शाखेकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

शहरात 2019 ते 2023 या पाच वर्षांत 382 गुन्हे दाखल असून, त्यामध्ये 461 पिस्तुले जप्त करण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये 526 आरोपींना अटक करण्यात आली होती. कालांतराने या प्रकरणातील आरोपी जामीनावर किंवा शिक्षा भोगून कारागृहाबाहेरही आले आहेत. या गुन्हेगारांकडून पुन्हा गंभीर गुन्हे घडू नयेत, यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

तस्करीच्या मुळापर्यंत जाणार

बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍यावर कारवाई होत असते. मात्र, बर्‍याचदा ते पिस्तूल पुरवणारे लोक कारवाईतून सुटतात, असा अनुभव आहे. त्यामुळे पिस्तूल बाळगणार्‍यांबरोबरच पिस्तूल बनवणार्‍यांपासून त्याच्या संपूर्ण वितरणसाखळीच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा निर्धार आहे, असे शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

बेकायदा पिस्तुले बाळगणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील पाच वर्षात पिस्तुलाचे किती गुन्हे दाखल आहेत, त्यातील आरोपींची पार्श्वभूमी काय, त्यांनी दुसर्यांदा पिस्तूल बाळगले आहे का ही माहिती एकत्र केली जाते आहे. तसेच त्यांना पिस्तुले विक्री करणार्यांवर देखील वॉच ठेवला जातो आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, नगर आणि सातारा येथे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्यांची माहिती संकलित केली जाते आहे.

– शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे

हेही वाचा

Back to top button