कोल्हापूर : दोन दिवसांत काँग्रेस आमदारांची बैठक : आ. सतेज पाटील | पुढारी

कोल्हापूर : दोन दिवसांत काँग्रेस आमदारांची बैठक : आ. सतेज पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दिवसभर काँग्रेस आमदारांशी सुरू असलेल्या चर्चेवरून अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार जाण्याची शक्यता कमी दिसते. त्यामुळे त्यांचा निर्णय वैयक्तिक असू शकतो, असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी सांगितले.

चव्हाण यांच्या रजीनाम्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्का बसणे स्वाभाविक आहे; परंतु काँग्रेसमधील दुसरी पिढी काँग्रेसचा झेंडा येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सक्षमपणे पुढे घेऊन जाण्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे महाराष्ट्रात नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री अशोक  चव्हाण यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, हे खरे आहे; परंतु आलेल्या प्रसंगाला सामोरे जात त्यातून मार्ग काढण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या सर्व मंडळींना करावा लागेल. तो आम्ही निश्चित करू, असेही ते म्हणाले.

राजीनाम्याचे कारण अद्याप समजलेले नाही. दोन दिवसांत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यानंतर यावर आपणास सविस्तर बोलता येईल, असे सांगून आ. पाटील म्हणाले, दोन दिवसांत काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात येईल. यावेळी काँग्रेसची लढाई पुढे सुरू ठेवण्याच्या द़ृष्टीने चर्चा केली जाईल. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, तरीदेखील आजपर्यंतच्या झालेल्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला 20 ते 22 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत. शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादीही फोडल्यामुळे भाजपमधील खदखद वाढली आहे. त्यामुळेच मंत्रीमंडळाचा विस्तार किंवा विधानपरिषदेच्या जागांबाबत निर्णय होऊ शकला नाही. राज्यसभेत भाजप निष्ठावंतांना संधी देणार की अन्य पक्षातून आलेल्यांना देणार हे दोनच दिवसांत स्पष्ट होईल, असेही आ. पाटील म्हणाले.

आम्ही ही लढाई नक्की जिंकू

पुढे विरोधकच असता कामा नये, अशी भाजपची भूमिका आहे. याला जनताच उत्तर देईल. महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीला वातावरण चांगले आहे. लोकांच्या अपेक्षा महाविकास आघाडीकडून आहेत. राज्यातील दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते व आम्ही ही लढाई नक्की जिंकू, असेही आ. पाटील म्हणाले.

Back to top button