Sunetra Pawar: काऱ्हाटी येथे सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक; भावी खासदार असा होता उल्लेख | पुढारी

Sunetra Pawar: काऱ्हाटी येथे सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक; भावी खासदार असा होता उल्लेख

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उभारण्यात आलेल्या फ्लेक्स फलकावर अज्ञाताने  शाईफेक केल्याची घटना घडली आहे. यामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान फलकावर शाई फेकल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी फलक उतरवला. Sunetra Pawar
काऱ्हाटीतील एका शेती फार्म मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शाई फेकल्याचे रविवारी (दि. ११) सकाळी निदर्शनास आले. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षातून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवार असतील असे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या फलक उभारले जात असून, त्यापैकी एका फ्लेक्सवर काऱ्हाटी गावात शाई फेकल्याने येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या फलकावर सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख केला गेला होता. Sunetra Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला आपला उमेदवार उभा करणार असल्याचे जाहीर केले आहे. पवार यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले नसले तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांना लोकसभेसाठी प्रचंड मतांनी विजयी करा, या आशयाचा फलक त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला होता. मात्र या फलकावर अज्ञातांनी शाई फेक केल्याचा प्रकार घडला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांचा फोटो आहे.
 शाईफेक चुकीची – सुप्रिया सुळे 
रविवारी बारामती दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या, हा प्रकार चुकीचा आहे. हे कृत्य ज्याने कोणी केले असेल त्याची चौकशी झाली पाहिजे.
हेही वाचा 

Back to top button