रस्त्यांची अर्धवट दुरुस्ती डोकेदुखी : 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने | पुढारी

रस्त्यांची अर्धवट दुरुस्ती डोकेदुखी : 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने

वारजे : पुढारी वृत्तसेवा : कर्वेनगर, वारजे माळवाडी परिसरात विविध ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असून, अर्धवट रस्तादुरुस्ती, राडारोडा आणि अर्धवट उपाययोजनांमुळे रहदारीसह वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. या ठिकाणी अपघातसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. वारजेतील सेवा रस्त्यासह माळवाडी पोलिस ठाणे रस्ता तसेच कर्वेनगर रस्त्यावर 24 तास पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनी टाकण्याचे काम अर्धवट व संथगतीने सुरू आहे. तसेच काम केलेल्या ठिकाणचा रस्ता योग्य पद्धतीने दुरुस्त करून पूर्ववत करण्यात आला नसल्याने वाहने घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत.

माळवाडी पोलिस ठाणेकडील खोदकाम केलेला रस्ता माती टाकून तात्पुरता दुरुस्त केल्याने नागरिकांना त्या रस्त्याने प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही हा रस्ता पूर्ववत करण्यात आला नाही. तसेच कर्वेनगर उड्डाणपुलाखाली जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेला रस्ता पूर्वीप्रमाणे दुरुस्त केलेला नाही. सरदार हॉटेलसमोर जवळपास 80 मीटर पाइपलाइन कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. या रस्त्यावर खोदकामातील राडारोडा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. परिसरातील अनेक पादचारी कर्वेनगर उड्डाणपुलाच्या बाजूचा हा रस्ता पर्यायी मार्ग असल्याने या रस्त्यावरून प्रवास करीत असतात.

काम सुरू असलेल्या ठिकाणी अभियंता देखील उपस्थित नसतात. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत तसेच कामाचे स्वरूप, सुरुवात आणि शेवट, याबाबत कोणताही माहिती फलक वा तपशील या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. नागरिकांना होणारा त्रास पाहता योग्य ती उपाययोजना करीत काम केलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ता वाहतुकीस खुला करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

जवळपास दोन महिने झाले आहेत. या ठिकाणी जलवाहिनीचे काम सुरू आहे. असंख्य नागरिक येथून प्रवास करीत असतात. कोणतेही नियोजन न करता काम सुरू आहे. मुख्य रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि या रस्त्यावरील अडथळे यातून नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.

– वीरेश शितोळे, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

Back to top button