नाला बुजवून प्लॉट विक्री! लोहगावातील प्रकार; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

नाला बुजवून प्लॉट विक्री! लोहगावातील प्रकार; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोहगाव परिसरात काही ठिकाणी नाले बुजवून प्लॉट विक्रीचे पेव फुटले आहे. यापूर्वी कारवाई होऊनसुद्धा प्लॉट विक्री चालूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जागा खरेदी करून घरे बांधल्यावर महापालिका कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी लोहगावमध्ये नाला बुजवून जागा विक्री चालू असल्याबद्दल दै.’पुढारी’ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर महापालिकेने त्या ठिकाणी कारवाई केली होती. तरीही लोहगाव, वडगाव शिंदे रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक 62/2 येथे नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहाला अडथळा होईल, अशाप्रकारे सीमाभिंत बांधून आणि सिमेंट रस्ते बनवून प्लॉट विक्री करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यातील काही प्लॉट सर्वसामान्य नागरिकांनी विकतही घेतले आहेत. त्यामुळे भविष्यात येथे बांधकामे झाल्यास ती अनधिकृत ठरून त्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे प्लॉट विक्री करणारे पैसे कमावून नामानिराळे होतील. मात्र सर्वसामान्यांच्या आयुष्याची पूंजी मातीमोल होण्याचा धोका आहे. धानोरीसह पुण्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात रस्ते, घरे, इमारती जलमय होऊन लाखो, कोट्यावधी रूपयांचे नुकसान होते. काही महिन्यांपूर्वीच आंबेगाव भागात महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून अनेक इमारती पाडल्या. त्यामुळे कर्ज काढून फ्लॅट विकत घेतलेले शेकडो सर्वसामान्य सदनिकाधारक रस्त्यावर आले. असाच काहीसा प्रकार लोहगावमध्ये होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने तातडीने कारवाई करून भविष्यात सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टाळावी, अशी मागणी सजग नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या भागाची लवकरच पाहणी करून अनधिकृत असे काही आढळल्यास नोटीस देऊन पुन्हा कारवाई करण्यात येईल.

-हनुमान खलाटे, उपअभियंता, बांधकाम विकास विभाग

हेही वाचा

Back to top button