डीपी रस्त्याच्या कामास मिळेना मुहूर्त; धायरीतील नागरिकांमध्ये नाराजी | पुढारी

डीपी रस्त्याच्या कामास मिळेना मुहूर्त; धायरीतील नागरिकांमध्ये नाराजी

धायरी : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्ता ते सावित्री गार्डन मंगल कार्यालयादम्यानच्या तीस मीटर डीपी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दोन महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने दिले होते. मात्र, अद्यापही या कामास मुहूर्त मिळाला नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावस्कर यांनी दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याची पाहणी केली होती. तसेच जागा मालकांचीही बैठक घेतली होती. त्या वेळी या रस्त्याचे काम पंधरा दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु, या रस्त्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही.

रस्त्यात जागा जात असलेल्या बाधित जागा मालकांना टीडीआर व एफएसआय स्वरूपात मोबदला देण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यास जागा मालकांनीही सहमती दर्शविली आहे. परंतु, हे काम का रखडले आहे, हे नागरिकांना कळेनासे झाले आहे. आमदार भीमराव तापकीर यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, बाधित जागा मालक यांची बैठक घेण्यात आली होती. या कामास सहकार्य करण्यास जागा मालकांनी सहमती दर्शवली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 9 मीटर बाय 800 मीटर रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब पोकळे म्हणाले, ’महापालिकेने या रस्त्याचे काम लवकर सुरू करावे. हा रस्ता झाल्यानंतर धायरीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.’

धायरी गावातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी डीपी रस्त्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या रस्त्याच्या कामासाठी जागा मालकांनी सहमती दर्शवली आहे. त्यांना महापालिका प्रशासनाने त्वरित एफएसआय व टीडीआर स्वरूपात मोबदला देऊन या रस्त्याचे काम सुरू करावे.

-भीमराव तापकीर, आमदार

या रस्त्याच्या कामाची निविदा मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. ती मंजूर झाल्यानंतर लवकरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल.

-अनिरुद्ध पावस्कर, मुख्य अभियंता, पथ विभाग, महापालिका

हेही वाचा

Back to top button