विद्यार्थ्यांमधील रोजगारक्षमता, उद्योजकतावाढीसाठी प्रयत्न : डॉ. सुरेश गोसावी | पुढारी

विद्यार्थ्यांमधील रोजगारक्षमता, उद्योजकतावाढीसाठी प्रयत्न : डॉ. सुरेश गोसावी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंटर्नशिप पोर्टलचे अनावरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील रोजगारक्षमता आणि उद्योजकतावाढीसाठी स्थापन केलेल्या या पोर्टलचे अनावरण बुधवारी (दि. 7) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, माहिती तंत्रज्ञान कक्षाचे व्यवस्थापक नितीन पाटील, एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक हर्डीकर आदी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध अभ्यासक्रमांमध्ये इंटर्नशिप, ऑन द जॉब ट्रेनिंग, अशा विविध नवीन संकल्पना आल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना इंटर्नशिप कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्योग, व्यवसाय, सहकारी संस्था, एनजीओ अशा सर्व संस्थांमार्फत विद्यार्थ्यांसाठी वेगवेळ्या इंटर्नशिप उपलब्ध करून देण्याच्या हेतूने इंटर्नशिप पोर्टलची स्थापना केली आहे. या पोर्टलच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण बुधवारी करण्यात आले.

या पहिल्या टप्प्यात विविध संस्था, कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इंटर्नशिपची नोंदणी विनामूल्य करण्याची व्यवस्था केली आहे. तर दुसर्‍या टप्प्यात महाविद्यालयांच्या नोडल ऑफिसरमार्फत विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाजवळ, घराजवळ उपलब्ध असणार्‍या सर्व इंटर्नशिपची माहिती मिळू शकणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परिक्षेत्रातील (पुणे, नाशिक, अहमदनगर) सर्व विद्यार्थी कोणत्याही शुल्काशिवाय या पोर्टलवरील सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत.

इंटर्नशिप, ऑन जॉब ट्रेनिंग अशा सर्व नवीन संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी विद्यापीठाने मोफत ऑनलाइन प्रणालीची व्यवस्था केली आहे. याच्या पहिल्या टप्प्यामध्ये इंटर्नशिप देणार्‍या सर्व संस्थांची नोंदणी करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

– डॉ. पराग काळकर, प्र- कुलगुरू,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
इंटर्नशिप पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्गात शिकविले जाणारे ज्ञान व्यवहारात आणि व्यवसायात कसे वापरायचे, याची प्रत्यक्ष संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

– डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हेही वाचा

Back to top button