व्हॉट्सअ‍ॅपमुळे माय-लेकराची भेट; समाज माध्यमाचा असाही एक सदुपयोग

व्हॉट्सअ‍ॅपमुळे माय-लेकराची भेट; समाज माध्यमाचा असाही एक सदुपयोग

धानोरी : पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोर 'तो' चुलत भावाच्या दुचाकीवरून खाली उतरला… अंगात त्राण नाही अन् धड चालताही येत नाही… झोप न मिळाल्याने डोळे लाल झालेल्या आणि भेदरलेल्या अवस्थेतील त्या मुलाची आणि आईची नजरानजर झाली. आईने त्याला लहान बाळाप्रमाणे छातीशी कवटाळले!

छत्तीस तासांपासून अचानक बेपत्ता झालेला 'तो' मुलगा केवळ एका व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे सापडला. समाज माध्यमे ही दुधारी शस्त्रासारखी आहेत. मात्र, योग्य पद्धतीने त्यांचा वापर केल्यास समाजासाठी त्यांचा सदुपयोग करता येऊ शकतो, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. धानोरी परिसरात राहणारा राहुल (नाव बदलले आहे) हा मानसिकदृष्ट्या अपरिपक्व असलेला 25 वर्षांचा तरुण गेल्या 4 फेब्रुवारी रोजी आपल्या भावाला भेटल्यानंतर बेपत्ता झाला होता. तो सवईप्रमाणे नेहमीच्या रस्त्याने आणि ओळखीच्या लोकांकडे जाऊन माघारी येत असे. त्या दिवशी दुपारनंतरही तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. रात्र झाली तरी तो न सापडल्याने शेवटी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान राहुल 'हरविल्या'ची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यान, ही बातमी समाज माध्यमांमुळे सर्वत्र वार्‍यासारखी पसरली. 'हिमगिरीयन्स ग्रुप'च्या माध्यमातून ही गोष्ट विद्यानगर येथील रेश्मा गिरमे यांना समजली. त्यांनी राहुलला शोधायला मदत करण्याच्या हेतूने याबाबतचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस मोबाईलवर ठेवले होते. भोसरी येथे राहणारी रेश्मा यांची पुतणी प्राची गिरमे हिने ते व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहिलेले. त्यामध्ये वर्णन केलेला तरुण सोमवारी संध्याकाळी सातनंतर त्यांना त्यांच्या घराजवळील बाजारात दिसून आला. त्यांनी लगेचच रेश्मा यांना फोन करून खातरजमा करून घेतली आणि सूत्रे फिरली.

आई-वडिलांच्याडोळ्यांत आनंदाश्रू!

चोवीस तासांपासून शोध घेणार्‍या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी तातडीने भोसरीकडे धाव घेतली. परिसर तासभर पिंजून काढल्यानंतर रात्री पावणेदहाच्या सुमारास भोसरी चौकातील एचपी पेट्रोल पंपाजवळ बसलेला राहुल एका नातेवाईकांला दिसला. सर्व जण तिथे जमले. दोन दिवस आणि एक रात्र उपाशीपोटी असलेल्या राहुलला खाऊ घातले. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिस स्टेशनला जाऊन त्याच्या वडिलांनी राहुल हरविल्याची तक्रार मागे घेतली. त्याची भेट झाल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news