पुणे : पुढारी वृत्तसेवा : जंगली महाराज रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणार्या कॅबचालकाला अडवून त्याच्याकडील रोकड, मोबाईल, सोनसाखळी असा ऐवज लुटून पसार झालेल्या चोरट्यांना मुंबईतून अटक करण्यात आली. पीयूष राजेश मरोठे (वय 22, रा, वानवडी), प्रणय आनंद लोंढे (वय 18, रा. चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत एका मोटारचालकाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. शुक्रवारी (2 फेब्रुवारी) मध्यरात्री जंगली महाराज रस्त्यावर ही घटना घडली होती. मोटारचालक मध्यरात्री जंगली महाराज रस्त्यावरून निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. त्यानंतर त्यांना धमकाविले. ऑनलाइन पद्धतीने अकरा हजार रुपये खात्यात जमा करून घेतले. मोबाईल संच आणि सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तेथे धाव घेतली.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात चोरटे मुंबईला पसार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अजित बडे आणि तपास पथक मुंबईला रवाना झाले. चोरट्यांना वांद्रे परिसरात पकडले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरटे मुंबईतून उज्जैनला पसार होण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित बडे, अविनाश भिवरे, राजकिरण पवार, मिलिंद काळे, गणपत वालकोळी, गणेश जाधवर यांनी ही कामगिरी केली.
हेही वाचा