Murder Case : व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्‍या भावाचा खून | पुढारी

Murder Case : व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्‍या भावाचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यसनासाठी जमीन विक्री करण्याचा तगादा लावणार्‍या सख्ख्या भावाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून प्रकरणात कोणतेही धागेदोरे नसताना शिरूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूरमधील घोड नदीपात्रात सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटवून खून प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी भावासह काका आणि आत्येभावाला अटक केली आहे.

कृष्णा गोकूळ विघ्ने (वय 32, रा. आनंदगाव, शिरूर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ अजिनाथ गोकूळ विघ्ने (वय 26), चुलता पांडुरंग अर्जुन विघ्ने (वय 50), आत्येभाऊ गणेश प्रभाकर नागरगोजे (वय 29, रा. एवलवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) यांना अटक करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील पाचर्णेमळा परिसरात अनोळखी तरुणाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत 31 जानेवारी रोजी सापडला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घोड नदीत टाकून देण्यात आला होता. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास करण्यात येत होता. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी खून प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले होते. कृष्णा विघ्ने याची ओळख पटल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपासाची दिशा निश्चित केली. कृष्णाला दारू पिण्याचे व्यसन होते. जमीन विक्री करण्यासाठी त्याने कुटुंबीयांकडे तगादा लावला होता. कुटुंबीयांशी तो भांडण करून त्यांना त्रास देत होता.

त्याचा सख्खा भाऊ अजिनाथने काका आणि साथीदारांच्या मदतीने खून केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आनंदगावातून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत तिघांनी खून केल्याची कबुली दिली.पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गु्न्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, एकनाथ पाटील, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे यांनी ही कामगिरी केली.

असा काढला काटा

कृष्णा विघ्ने याला दारूचे प्रचंड व्यसन होते, तो जमीन विक्रीचा घरच्यांना तगादा लावत होता. तसेच घरातील व्यक्तींना मारहाण देखील करीत असे. त्यामुळे सर्वजण त्याच्या त्रासाला वैतागले होते. त्याचा भाऊ अजिनाथने चुलता पांडुरंग आणि आत्येभाऊ गणेशच्या साथीने त्याचा त्रास कायमचा संपविण्याची योजना आखली. पुण्याकडे कृष्णाला उपचारासाठी घेऊन जातो, असे सांगून तिघे त्याला एका छोट्या टेम्पोतून घेऊन निघाले. शिरूरमधील घोड नदीच्या पुलावर आल्यानंतर तिघांनी कृष्णाचे हातपाय बांधून त्याला पुलावरून नदीपात्रात फेकून दिले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना मृतदेह मिळून आला. त्यांनी कृष्णाच्या हातावरील ’एम’ नावाच्या टॅटूमुळे त्याची ओळख पटवून आरोपींना बेड्या ठोकल्या.

हेही वाचा

Back to top button