Doctor Strike : राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, ‘या’ आहेत मागण्या | पुढारी

Doctor Strike : राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, 'या' आहेत मागण्या

मुंबई : राज्य सरकारची सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टर आज (दि.७) सायंकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत संपावर  जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. सोमवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांची या निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘सेंट्रल मार्ड’च्या प्रतिनिधींसोबत झालेली बैठकही निष्फळ ठरली. सेंट्रल मार्डने गेल्या वर्षी ३ जानेवारीला संप मागे घेतला होता. परंतु आज त्या आश्वासनाला ३९३ दिवस उलटून गेले तरीही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. (Doctor Strike)

निवासी डॉक्टर ७ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. दरम्यान, आज दुपारी अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवासी डाॅक्टरांची बैठक बोलावली असून यामध्ये काही तोडगा निघण्यास मार्ड संप मागे घेऊ शकते.

सेंट्रल मार्डने आजपर्यंत २८ पत्रे लिहून प्रशासकीय आणि मंत्री स्तरावर पाठपुरावा केला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या भेटीत, डॉक्टरांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर सोडवण्याचे तोंडी आश्वासन देऊनही अद्याप कोणतीही मागणी पूर्ण केलेली नाही.

सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे म्हणाले की, सेंट्रल मार्डने गेल्या अनेक वर्षांपासून वसतिगृहांच्या दुरवस्थेबाबतच्या मागण्यांची पूर्तता केली नाही, राज्यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांना राहण्याची व्यवस्था नाही, नियमित मानधन मिळत नसल्याने २८ वेळा पत्रव्यवहार केला. मात्र यावर ठोस पावले उचलण्याऐवजी शासनाकडून केवळ तोंडी आश्वासने मिळत आहेत. या मागण्यांबाबत सोमवारीही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली मात्र या बैठकीतही कोणताही निर्णय न झाल्याने संपावर जाणार असल्याचे डॉ. अभिजीत यांनी सांगितले.

प्रमुख मागण्या-

  • निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
  • निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
  • निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.

Back to top button