बारामतीत भाजपच्या चिन्हावरच उमेदवार : जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे | पुढारी

बारामतीत भाजपच्या चिन्हावरच उमेदवार : जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात भाजपच्या चिन्हावरच उमेदवार असेल आणि त्याला निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे रात्रीचा दिवस करतील, असा आत्मविश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी व्यक्त केला आहे. नसरापूर (ता. भोर) येथील श्री बनेश्वर मंदिरात गाव चलो अभियानाची सुरुवात रविवारी (दि. 4) करण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत वासुदेव काळे बोलत होते. भाजपचे बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर, समन्वयक जालिंदर कामठे, शेखर वढणे, वैशाली सणस, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, विनायक ठोंबरे, जिल्हा नियोजन सदस्य जीवन कोंडे, आनंद देशमाने, राजाभाऊ वाघ, सुनील जागडे, सचिन कन्हेरकर, रविकाका खोमणे, सचिन मांडके, राजाभाऊ गुरव, गिरीष जगताप, डॉ. नागेंद्र चौबे, निलेश कोंडे, पल्लवी फडणीस, वैशाली बांदल उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत प्रत्येक गावामध्ये प्रवासी कार्यकर्ता जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरीकांशी संवाद साधणार आहे. गाव चलो अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या योजना, केलेला विकास व भाजप विचार घरोघरी पोहचणार आहे. मोदी सरकारने शेतकरी सन्मान योजनेव्दारे सुमारे 11 कोटी शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यावर थेट लाभ मिळत आहे. भाजपाचा विकास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बारामती मतदारसंघात 2 हजार 448 बुथमधील प्रत्येक कार्यकर्त्यांसमवेत बाहेर गावचा एक प्रवासी कार्यकर्ता प्रत्येक गावात पोहचून लोकांसमवेत बैठक, चर्चा, संवाद साधत असल्याची माहिती भाजप पदाधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button