‘जलजीवन’ची फक्त एक योजना पूर्ण; ऐन दुष्काळात सुलतानी संकट | पुढारी

‘जलजीवन’ची फक्त एक योजना पूर्ण; ऐन दुष्काळात सुलतानी संकट

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड पंचायत समितीमार्फत तालुक्यातील 56 गावांसाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांची जलजीवन मिशनसाठी योजनेची कामे सुरू असून मुदत संपल्यानंतरही अजूनही एकाही पाणी योजनेचे काम पूर्ण झालेले नसताना या विभागाचे उपकार्यकरी अभियंता अमित आडे दिशाभूल करणारी माहिती देऊ लागले आहेत. पाणीपुरवठा विभागात सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.

पंचायत समिती स्तरावर असलेल्या पाणी विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमित आडे यांच्या नियंत्रणाखाली दौंड तालुक्यातील लिंगाळी, दापोडी, पाटेठाण, खोपोडी, भांडगाव,कौठडी, हिंगणी बेरडी, खानोटा, खुटबाव, नायगाव, पडवी, राजेगाव ,पारगाव, वाखारी, आलेगाव ,वाळकी, वडगाव दरेकर ,गावडे बागडे वस्ती ,टाकळी, नाथाची वाडी, वासुंदे , खोर , कोरेगाव भिवर, मिरवडी, हिंगणी गाडा, मळद,नांदूर ,सहजपूर, उंडवडी, खोरवडी, पेडगाव, वाटलूज, पाणवली, कडेठाण, लडकतवाडी ,शिरापूर, वडगाव बांडे ,पिलानवाडी, कुसेगाव, पिंपळगाव ,जिरेगाव, एकेरी वाडी, भरतगाव, बोरीबेल, रोटी, टेळेवाडी, रावणगाव, खडकी, गलांडवाडी, नंदादेवी, लोणारवाडी, गोपाळवाडी, देवकरवाडी, मसनरवाडी, माळवाडी, लिंगाळी आणि मेरगळवाडी अशा 56 गावांमधून जलजीवन मिशन योजनेची कामे सुरू आहेत, त्यातील दापोडी वगळता उर्वरित 55 गावांच्या योजना कामाची मुदत संपूनही अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. डिसेंबर 2023 ला काम पूर्ण करण्याची मुदत संपून गेली आहे. गावागावांत अनेक ठिकाणी या योजना अर्धवट झाल्या असून कामे बंद करून ठेकेदार गायब झाले आहेत.

या सर्व विषयांची माहिती असणारे दौंड पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागातील उपकार्यकरी अभियंता अमित आडे यांच्याकडे भोर, वेल्हा, इंदापूर आणि दौंड या चार तालुक्यांचा पदभार दिला आहे. दौंडच्या कार्यालयामध्ये त्यांची चौकशी केल्यास ते इंदापूरला आहेत. इंदापूरमध्ये विचारले असता भोरमध्ये आहेत, भोरमध्ये विचारले असता ते वेल्ह्यात आहेत, अशी दिशाभूल करणारी माहिती या विभागातून दिली जात आहे, मात्र नक्की हे अधिकारी कुठे असतात हे समजणे अवघड झाले आहे, चुकून ते भेटले तरी माहिती देत नाहीत, तुम्ही जिल्ह्या कार्यालयाला विचारा, असा सल्ला पत्रकारांना देत असतात.

दौंडमध्ये सध्या आडे यांच्या हाताखाली खासगी एजन्सीचे दोन शाखा अभियंता नेमणुकीस आहेत. या दोघाही शाखा अभियंत्याकडून कुठलीच माहिती कोणालाच दिली जात नाही, मात्र या दोन अभियंत्यांकडून तालुक्यातल्या या कामावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे. नेमणुकीस असलेले हे अधिकारी माहिती देत नाहीत. या विभागाचे उपविभागीय अधिकारी जागेवर सापडत नाहीत.
या सर्वाचा परिणामी दौंड तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची मुदत संपूनही अद्याप दापोडी गाव वगळता 55 गावांच्या योजना अपूर्ण आहेत. आता फेब्रुवारी महिना सुरू असून लवकरच उन्हाळ्याची सुरुवात होणार आहे. अगोदरच कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे धरणातील पाण्याचा साठा कमी असल्याने तालुक्यातून वाहणार्‍या कालव्याच्या खडकवासला धरणातील पाण्याची परिस्थिती ही मागील काही वर्षांपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात आहे, जलजीवन ही महत्त्वाकांशी योजना असून वारेमाप पैसे खर्च करूनही अपुरी असल्याने जनतेचे मात्र हाल होणार आहेत.

हेही वाचा

Back to top button