पुणेकरांना खूशखबर..! स्वारगेटहून थेट पिंपरी मेट्रो प्रवास लवकरच | पुढारी

पुणेकरांना खूशखबर..! स्वारगेटहून थेट पिंपरी मेट्रो प्रवास लवकरच

पिंपरी/ पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिव्हिल कोर्ट स्टेशन ते स्वारगेट स्टेशन अशी 3.64 किलोमीटर अंतराच्या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी सोमवारी (दि. 5) यशस्वीपणे पार पडली. केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी व चाचणी पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसात हा मार्ग प्रवाशांसाठी सरू होणार आहे. त्यामुळे पिंपरीहून थेट स्वारगेटपर्यंत प्रवास करता येणार आहे. भूमिगत असलेल्या सिव्हिल कोर्ट स्टेशनपासून स्वारगेटच्या भूमिगत स्टेशनपर्यंत सोमवारी सकाळी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. बुधवार पेठ स्टेशन, मंडई स्टेशन पार करून मेट्रो स्वारगेटला पोहचली. चाचणीसाठी एक तास वेळ लागला.

चाचणी दरम्यान मेट्रोचा वेग ताशी 7.5 किलोमीटर इतका ठेवण्यात आला होता. सिव्हिल कोर्ट स्टेशन ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदी पात्राच्या खालून जातो. नदीच्या खालून मेट्रो जाणे ही दोन्ही शहरासाठी महत्वपूर्ण घटना आहे. सिव्हिल कोर्ट स्टेशन 33.1 मीटर खोल, बुधवार पेठ स्टेशन 30 मीटर खोल, मंडई स्टेशन 26 मीटर खोल आणि स्वारगेट स्टेशन 29 मीटर खोल आहे. चाचणी यशस्वी झाल्याने लवकरच केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी व चाचणी होईल. त्यांनी परवानगी दिल्यानंतर मेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट असा थेट प्रवास करता येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुणे शहराच्या मध्यवस्तीत जाणे यामुळे शक्य होईल. तसेच कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, रविवार पेठ, भाजी मंडई, स्वारगेट एसटी स्थानक, तुळशी बाग, सारस बाग, गणेश कला-क्रीडा रंगमंदिर, पंडित नेहरू स्टेडियम, मुकुंदनगर, कसबा पेठ, लक्ष्मी रोड, कमला नेहरू रुग्णालय, गाडीखाना, शनिपार चौक, बाजीराव रस्ता आदी ठिकाणी मेट्रोने जाणे नागरिकांना शक्य होणार आहे.

काही महिन्यात पिंपरीतून स्वारगेट प्रवास शक्य

सिव्हिल कोर्ट भूमिगत स्टेशन ते स्वारगेट स्टेशन मार्गावरील चाचणी पिंपरी-चिंचवड आणि पुणे या शहरांसाठी ऐतिहासिक घटना आहे. हा मार्ग भूमिगत असून, मुठा नदीच्या खालून जात आहे. येत्या काही महिन्यात पिंपरी- चिंचवड महापालिका स्टेशन ते स्वारगेट स्टेशन असा थेट प्रवास करणे शक्य होईल. रुबी हॉल क्लिनिक स्टेशन ते रामवाडी स्टेशन या एलिव्हेटेड मार्गावरील केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी पूर्ण झाल्याने येत्या काही दिवसात हा मार्ग प्रवाश्यांसाठी सुरू होईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button