वडापाव, मसाला पावनंतर आता आईस्क्रीम पाव! | पुढारी

वडापाव, मसाला पावनंतर आता आईस्क्रीम पाव!

मुंबई : हल्ली अन्नपदार्थांचे इतके भन्नाट ‘फ्यूजन’ पाहायला मिळत आहेत की पाहणारे चक्रावूनच जातात. आपण कधी कल्पनाही करणार नाही असे पदार्थ बनवून ते चक्क विकलेही जात आहेत. आपल्याला वडापाव, मसाला पाव, मिसळ पाव असे प्रकार माहिती आहेत. मात्र, कधी ‘आईस्क्रीम पाव’ नावाचा प्रकारही असतो हे ऐकिवात होते का? आता हेही मिळू लागले आहे!

पावामध्ये आईस्क्रीम घालून ते खाणे ही कल्पना कशी वाटते? अनेकांना हे विचित्र वाटत असले तरी सध्या असा आईस्क्रीम पाव मिळू लागला आहे. हा आईस्क्रीम पाव कसा बनवतात याची रेसिपीही एका इन्स्टाग्राम पेजवर पाहायला मिळते. यामध्ये गरमागरम पावामध्ये थंडगार आईस्क्रीम घालून ते खवय्यांना दिले जाते.

एका फूड स्टॉलवर असा आईस्क्रीम पाव शंभर रुपयांना मिळतो! यामध्ये सुरुवातीला मोठ्या पॅनवर भरपूर बटर टाकून पाव भाजून घेतले जातात. त्यानंतर या गरमागरम पावमध्ये आईस्क्रीमचा एक मोठा स्लाईस टाकला जातो व तो ग्राहकाला दिला जातो. या व्हिडीओवर यूजर्सनी अनेक प्रकारच्या भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत!

Back to top button