सकारात्मक बातमी : एचआयव्हीबाधित रुग्णसंख्येमध्ये घट

सकारात्मक बातमी : एचआयव्हीबाधित रुग्णसंख्येमध्ये घट

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 497 एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. एआरटी सेंटरमध्ये 2022 या वर्षात 6 हजार 485 रुग्णांची नोंद होती, तर 2023 या वर्षात 5 हजार 988 इतक्याच रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील एचआयव्ही बाधितांसाठी वायसीएममध्ये 15 वषार्ंपासून एआरटी केंद्र सुरु आहे. येथे निगडी, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, दापोडी, मोशी तसेच पिंपरी-चिंचवड भागातील विविध रुग्णांवर उपचार करण्यात येतात. येथील एआरटी केंद्रात दरवर्षी नोंद होणार्‍या रुग्णांची माहिती घेतली असता 2022 या वर्षाच्या तुलनेत 2023 या वर्षात 497 एचआयव्ही बाधित रुग्णांची नोंद कमी झाली आहे.

हजारापेक्षा अधिक रुग्णांचे स्थलांतर

वायसीएमच्या एआरटी केंद्रात 2023 या वर्षात नोंद झालेल्या एकूण 5 हजार 988 रुग्णांपैकी ऑगस्ट 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत एकूण 1130 रुग्णांचे अन्य एआरटी केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. तर, याच कालावधीत अन्य केंद्रातूनही काही रुग्ण वायसीएमच्या एआरटी केंद्रात स्थलांतरित झाले आहेत. वायसीएम रुग्णालयाच्या एआरटी केंद्रात पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील एचआयव्ही बाधित रुग्णही उपचारासाठी येत होते.

त्यामध्ये आळंदी, नारायणगाव, मंचर, जुन्नर, आळेफाटा, देहू शहर आदी परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या सहायक संचालकांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि वायसीएम एआरटी केंद्र यांना एचआयव्ही रुग्णांच्या सोयीसाठी व त्यांच्यावर सुरळीत उपचार करण्यासाठी त्यांच्या निवासाजवळील एआरटी सेंटरला स्थलांतर करण्याचा आराखडा कळविलेला आहे. त्यानुसार संबंधित रुग्णांना नजीकच्या एआरटी केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे.

वायसीएम एआरटी केंद्रामधून रुग्णांना त्यांच्या घराजवळील केंद्रात पाठविण्यात आले आहे. एकाही रुग्णाला जबरदस्तीने संबंधित केंद्रांमध्ये पाठविलेले नाही.

– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news