फोपसंडीतील रांजणखळग्यांचे पर्यटकांना आकर्षण

फोपसंडीतील रांजणखळग्यांचे पर्यटकांना आकर्षण
ओतूर : पुणे व अहमदनगरच्या सीमेवर अकोले तालुक्यात अतिदुर्गम, निसर्गसौंदर्य लाभलेल्या फोपसंडी  येथे  कलहीच्या रानातील ओढ्यामध्ये वेगवेगळे  रांजणखळगे तसेच दुर्लक्षित दुर्मीळ कुंडे आहेत. घनदाट जंगल, डोंगरटेकड्यांनी वेढलेल्या या  परिसरातील  नैसर्गिक  कुंडे,  रांजणखळगे  पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. येथे कढई कुंड, पाच फुटाच्या चुल्हीच्या आकाराचे चुल्हांगण कुंड, चमच्याच्या आकाराचे चार फुट खोलीचे चमचा कुंड, अर्धवर्तुळाकार पसरट बशीच्या आकारासारखे कपबशी कुंड, कमोड कुंड, रांजण कोथळीच्या आकारासारखे कोथळी कुंड, जनावरांच्या पायाच्या मागासारखे पंजाकुंड, बदामी आकाराचे बदामी कुंड, शेकडो दगडींच्या खाली अंधारी भागात असलेले अंधारे कुंड आहेत. थोड्या अंतरावर खाली ओढ्यामध्ये उरांड चोहंडीच्या ओघाखालीसुध्दा भिन्न आकाराचे छोटे-मोठे 30 ते 35 कुंड आहेत. हे ठिकाण फोपसंडीपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे.

तेथील नैसर्गिक रांजणखळगे पाहण्यासाठी पायवाटेने चालत जावे लागते. त्यासाठी किमान दीड तास वेळ लागतो. आजूबाजूला कारवी, उंबर, जांभळीचे, हिरड्यांचे जंगल आहे.

फोपसंडी हे चोहंडींचे, कडे-कपारीचे गाव
या ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष्यांचे मधुर आवाज ऐकायला मिळतात. उंच डोंगर-दरीखोर्‍यातील फोपसंडी हे चोहंडींचे, कडे-कपारीचे गाव म्हणून ओळखले जाते. या भागात नदी, नाले, ओढ्यात भिन्न प्रकारची पाषाणाच्या आकाराची चोहंडी आहेत. सन 1972 च्या दुष्काळात या कुंड चोहंडीचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला.

जंगलात शेकडो धबधबे
ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात येथील नैसर्गिक दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. येथे ऐतिहासिक कुंजरगड, बि—टिशकालीन पोप हाऊसचे अवशेष, शेकडो धबधबे, मिनी सांदण दरी, व्ही आकाराची दरी, डोंगर टेकड्या, गुहा, भुयारे, ढोली, गडदी, निसर्ग वैभव, येथील सूर्योदय, सूर्यास्त, विविध नैसर्गिक जैव संपदा फोपसंडी येथे जाऊन न्याहळणे म्हणजे अनुपम आनंद आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news