ललित कला केंद्रात तोडफोड; उपनिरीक्षक निलंबित | पुढारी

ललित कला केंद्रात तोडफोड; उपनिरीक्षक निलंबित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील तोडफोडीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. असे असतानाही बंदोबस्तावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने ही बाब नियंत्रण कक्षाला व वरिष्ठांना कळवली नाही. याच कारणामुळे बंदोबस्तावर असलेल्या उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी हे आदेश दिले आहेत.

सचिन शंकर गाडेकर असे निलंबित करण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी सायंकाळी रामायणात काम करणार्‍या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित ’जब वी मेट’ या नावाच्या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रामायणाचा विपर्यास केल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी नाटकाचा प्रयोग बंद पाडल्यानंतर मोठा गोंधळ झाला.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. 3) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अखील भारतीय विद्यार्थी परिषद, युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी जोरजोरात घोषणा देऊन शाहीफेक केली. ललित कला केंद्राच्या खिडकीच्या काचा फोडल्या. कुंड्या फोडून नुकसान केले. या वेळी ललित कला केंद्र (गुरुकुल) या ठिकाणी गाडेकर यांना बंदोबस्त दिलेला होता. सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतानासुध्दा गाडेकर यांनी योग्य ती दखल घेतली नाही. वरिष्ठ निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त यांच्यासह नियंत्रण कक्षासही घडलेला प्रकार कळविला नाही. त्यामुळे वरिष्ठांना घटनेची वेळीच माहिती मिळाली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर गाडेकर यांचे सेवेतून गंभीर स्वरूपाच्या हलगर्जीपणामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात
आला आहे.

भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

भारतीय युवा मोर्चाच्या निखिल राजेंद्र शाळीमकर (34), शिवम मारुती बालवडकर (24), किरण चंद्रकांत शिंदे (33), सनी रमेश मेमाणे (32), प्रतीक कुंजीर (29) आणि दयानंद शिंदे (26) या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह अन्य 5 ते 6 महिला व पुरुष कार्यकर्त्यांवर ललित कला केंद्राचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गुरव करीत आहेत.

अभिनेता प्रवीण तरडे करणार चौकशी; निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात सादर केलेल्या वादग्रस्त नाटकाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सत्यशोधन समिती स्थापना केली असून, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील समितीतर्फे या घटनेचे सत्यशोधन केले जाणार आहे. त्यात अभिनेता प्रवीण तरडे यांच्यासह इतर सहा सदस्यांचा समावेश आहे.विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे हे काम पाहणार आहेत.

तर, समितीमध्ये सदस्य म्हणून अभिनेता प्रवीण तरडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, अधिसभा सदस्य विनायक आंबेकर, डॉ. ज्योती भाकरे, प्राचार्य डॉ. क्रांती देशमुख; तर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे या समितीचे सदस्य सचिव आहेत. समितीला एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असून, समितीला महिनाभरात संबंधित प्रकरणाचा अहवाल कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना द्यावा लागणार आहे. नाटकावरून घडलेल्या घटनेबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह सर्व कर्मचारी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, युवासेना, पतित पावन संघटना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू वडार संघटना, समस्त आजी-माजी विद्यार्थी कृती समिती, मातंग समाजविकास आघाडी, विद्यापीठातील विविध प्राध्यापक आदी संघटनांचे निवेदन विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. या समितीतर्फे सत्यशोधन केले जाणार आहे.

हेही वाचा

Back to top button