Ajit Pawar : खासदारकीला मिठाचा खडा लागला, तर आमदारकीला वेगळा विचार करेन : अजित पवार

Ajit Pawar : खासदारकीला मिठाचा खडा लागला, तर आमदारकीला वेगळा विचार करेन : अजित पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघात माझ्या विचारांचा खासदार झाला, तर विकासाची गती आणखी किती तरी पटीने वाढवू. काही लोक तुम्हाला भावनिक बनवतील. खासदारकीला इकडे मत द्या, आमदारकीला अजितला द्या, असे म्हणतील. पण मला दोन्ही ठिकाणी तुमची साथ गरजेची आहे. खासदारकीला मला मिठाचा खडा लागला, तर आमदारकीला मी स्वतःच वेगळा विचार करेन, कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. बारामती व्यापारी महासंघातर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.  Ajit Pawar

पवार  पुढे म्हणाले की, राज्यात एनडीएकडून ४८ जागांचे वाटप होईल. मागे जेथे राष्ट्रवादीचे खासदार होते, त्या जागा आपल्याला मिळतील. या स्थितीत मी माझ्या पक्षाचा उमेदवार तेथे देणार आहे. लोकसभा व विधानसभा या दोन्ही वेळेला मला तुमची साथ लागेल. आपल्या विचारांचा खासदार झाला तर मोदी, शहांकडून मी हवी तेवढी विकासाची कामे मंजूर करून आणू शकतो; त्यासाठी माझ्याच विचारांचा खासदार असणे आवश्यक आहे. मला खासदारकीला मिठाचा खडा लागला, तर आमदारकीला मी वेगळा विचार करेन, कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला. Ajit Pawar

एकनाथ शिंदेच्या भूमिकेनंतर झालेली टीका आमच्याबाबतीत झाली नाही

मविआ सरकारमध्ये मी उपमुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मला मोकळीक होती. परंतु, मविआमधून फुटून एकनाथ शिंदे व सहकारी बाहेर पडले. त्यानंतर राज्यभर त्यांच्याबाबत नको नको ते शब्द वापरणे सुरु झाले. ५० खोके… एकदम ओके, गद्दार अशा भाषेत लोक संभावना करू लागले. परंतु मी व माझ्या सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतल्यावर राज्यात कोणी एका अक्षराने बोलले नाही.

Ajit Pawar : आमच्या पक्षाचे सगळेच तिकडे जाणार होते

आमच्या पक्षात सगळे तिकडे जाण्याची भूमिका घेणार होते. सध्या त्या गटात थांबलेले दहा-अकरा लोक पण जाणार होते. मला आता सगळे उघड करायचे नाही. पण सगळे ठरलेले असताना अचानक भूमिका बदलली गेली. माझ्या राजकीय जीवनात मी नेहमीच वरिष्ठांच्या भूमिकेचे समर्थन करत आलो. १९७८ पासून ते राष्ट्रवादीच्या स्थापनेपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. मी स्वतः दोनदा पंजा चिन्हावर आमदार तर एकदा खासदार झालो. मध्यंतरीच्या काळात सरकारमध्ये नसताना कामे थांबले होती. कामांची गती कायम राखायची असेल तर सत्ताधारी पक्षात असणे गरजेचे आहे. आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी आमची भूमिका बदललेली नाही. आजही आम्ही सेक्यूलर भूमिकेवर ठाम आहोत. छत्रपती शिवराय, शाहू-फुले- आंबेडकरांचे विचार घेवून पुढे जाणार आहोत.

 निकाल तुमच्या हाती

मी राजकीय जीवनात विकासकामांसाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी जेवढा वेळ देतो, तेवढा वेळ मी माझ्या व्यवसायात दिला, कष्ट घेतले, तर हेलिकाॅप्टर, विमानाने फिरेन. मी जेवढी कामे करू शकतो, तेवढी कामे कोणताच मायचा लाल करू शकत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीवेळी काहीजण रडतील, पण ते काम करू शकणार नाहीत, आता निकाल तुम्ही घ्या, असे आवाहन पवार यांनी केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news