काँग्रेस नेते सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात जाणार | पुढारी

काँग्रेस नेते सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात जाणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि आमदार झीशान सिद्दीकी हे पिता-पुत्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत 8 किंवा 10 फेब्रुवारी रोजी ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

बाबा सिद्दीकी हे वांद्रे पश्चिमचे माजी आमदार आहेत; तर झीशान हे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून विजयी झाले होते. वयाच्या 27 व्या वर्षी ते आमदार झाल्यामुळे ते चर्चेत आले होते. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या गटाचे मानले जातात. देवरा यांच्यासह काँग्रेसचे माजी खासदार सुनील दत्त यांच्याशीही त्यांचे निकटचे राजकीय संबंध होते. मात्र, मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात नुकताच प्रवेश केला आहे. मिलिंद यांच्या राजकीय निर्णयानंतर त्यांच्यासोबत सिद्दीकी पिता-पुत्रसुद्धा शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. मात्र सिद्दीकी यांचा मतदारसंघ मुस्लिमबहुल असल्यामुळे निवडणुकीत ते शिवसेनेला मतदान करणार नाहीत, अशी शक्यता धरून सिद्दीकी यांनी आपला मोर्चा अजित पवार गटाकडे वळविला असल्याची चर्चा आहे. सिद्दीकी यांच्या प्रवेशनंतर काँग्रेसचे आणखी दोन आजी-माजी आमदार अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Back to top button