उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया | पुढारी

उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

धुळे; पुढारी वृत्तसेवा : भारतात संविधानाचे आणि कायद्याचे राज्य आहे. कायदा हा प्रत्येकाला सारखाच आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने कायदा हातात घेणे, ही चुकीची बाब असल्याचे मत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबाराच्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया धुळ्यात दिली.

अमळनेर येथे साहित्य संमेलनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. त्यानंतर ते रात्री उशिरा धुळ्यात आले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. उल्हासनगर येथे पोलीस ठाण्यात झालेल्या घटने संदर्भात त्यांनी प्रत्येकाने कायदा पाळला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतात संविधानाचे राज्य आहे. तसेच कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. म्हणूनच प्रत्येकाने कायद्याचे बंधन पाळले पाहिजे. आणि कायद्याच्या चौकटीतच प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. या संदर्भात आपण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या समवेत चर्चा करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पदाच्या फलकांचे आकर्षण

धुळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तांतरानंतर प्रथमच येत असल्याने राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर फलकबाजी करण्यात आली होती .या फलकावर अजित पवार यांचा थेट भावी मुख्यमंत्री असा उल्लेख देखील करण्यात आला. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आगामी निवडणुका राज्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट ,शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, तसेच भारतीय जनता पार्टी हे सोबत लढणार असल्याचे निश्चित आहे .हाच फार्मूला विधानसभा निवडणुकीत देखील वापरला जाणार आहे. तीनही पक्षाकडून एकनाथराव शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होणार असल्याचे सांगितले जाते आहे. मात्र धुळ्यातदेखिल अचानक भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे नाव कार्यकर्त्यांकडून पुढे आले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Back to top button