Shivneri : रिंगरोडसाठी सक्तीने भूसंपादन; संमती न दिलेल्यांकडून ताबा घेणार | पुढारी

Shivneri : रिंगरोडसाठी सक्तीने भूसंपादन; संमती न दिलेल्यांकडून ताबा घेणार

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार्‍या रिंगरोडसाठी भूसंपादन करण्याचे काम सुरू असून, रिंगरोडसाठी 31 जानेवारीपर्यंत बाधित शेतकर्‍यांची पूर्वसंमती घेऊन भूसंपादन करण्यात येत होते. खेड तालुक्यात यासाठी अखेरच्या दोन दिवसांत 138 शेतकर्‍यांनी तब्बल 271 कोटी रुपयांना संमतीपत्र दिले. या सर्व शेतकर्‍यांना आता एकूण रकमेच्या वाढीव 25 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. परंतु, मुदतीत संमतीपत्र न दिलेल्या शेतकर्‍यांकडून आता कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागाची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या रिंगरोडसाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम रिंगरोडसाठी म्हणजे भोर, मावळ, मुळशी आणि हवेलीतील 37 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येत असून, हे भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे. दुसर्‍या टप्प्यात पूर्व रिंगरोडसाठी मावळ 11, खेड 12, हवेली 15, पुरंदर 5 आणि भोर तालुक्यातील 3 गावांमध्ये जमीन भूसंपादन करण्याचे काम सुरू आहे.

यामध्ये खेड तालुक्यात गेल्या साडेतीन महिन्यांपासून ही प्रकिया सुरू आहे. शेतकर्‍यांचा विरोध व दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनामुळे दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला यश देखील आले व शेतकर्‍यांना काही प्रमाणात वाढीव दर देखील मिळाले. या वाढीव दरानुसारच संमतीपत्र देण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. अखेरचे दोन दिवस बाधित शेतकर्‍यांनी संमतीपत्र देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अखेरच्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत कार्यालय सुरू ठेवून ही संमतीपत्रे घेण्यात आली.

दृष्टिक्षेपात रिंगरोड

  • खेड तालुक्यातील 12 गावांत भूसंपादन
  • एकूण खातेदार 6 हजार 633
  • वाटप करण्यात येणारी रक्कम 1 हजार 736 कोटी
  • आतापर्यंत वाटप सुमारे 400 कोटी
  • अखेरच्या दोन दिवसांत संमतीपत्र 271 कोटी
  • शिल्लक भूसंपादन आता सक्तीने होणार

हेही वाचा

Back to top button